क्राईम ताज्या घडामोडी पुणे शिरूर

शाळेजवळ जुगार अड्डे; मुलांच्या भविष्यासोबत का खेळत आहे प्रशासन?

आमच्या मुलांना गुन्हेगारीकडे वळवण्याला जबाबदार कोण?”

शिरूर : शाळेच्या अवघ्या काही मीटर अंतरावर जुगाराचे अड्डे सर्रास सुरू असल्याचे वास्तव समोर येत आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षण घेण्याच्या ठिकाणी अशा गैरकृत्यांचा शिरकाव होणे ही अतिशय गंभीर बाब असून, यामुळे लहान मुलांचे भवितव्य धोक्यात येत आहे.

शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथील परिसरांमध्ये अंगणवाडी शाळेजवळ मटका, गुडगुडी, सोरट यांसारख्या प्रकारांचा जुगार खुलेआम सुरू असून, हे अड्डे शाळांच्या जवळपास सुरू असल्याचे स्थानिक नागरिकांनी निदर्शनास आणून दिले आहे. मात्र याठिकाणी खाकीतील काकाचे आर्थिक हितसंबंध तर नाही ना? असा सवाल पालक व सामान्य नागरिक उपस्थित करत आहेत. विशेष म्हणजे या अड्ड्यांवर अनेक वेळा पोलीस कारवाईचे आश्वासन देतात, मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही.

विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या ठिकाणी वाईट सवयी, गुन्हेगारी आणि व्यसनांकडे ओढणारे हे अड्डे म्हणजे समाजाच्या मुळावर घाव आहे. या परिसरात राहणारे पालक, शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते यांचा एकच सवाल आहे – “आमच्या मुलांना गुन्हेगारीकडे वळवण्याला जबाबदार कोण?”

पोलिस प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि शिक्षण विभाग यांनी तातडीने याची दखल घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा समाजात अपप्रवृत्तींना पोषक वातावरण तयार होईल आणि त्याचा फटका पुढील पिढीला बसणार, हेही तितकेच खरे.

“शाळेच्या शेजारी मटका सुरु आहे, आम्ही आमच्या मुलांना कसे सुरक्षित ठेवणार?” असा संतप्त सवाल एका पालकाने उपस्थित केला. प्रशासनाने आता तरी जागे होऊन कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Featured

error: Copying content is not allowed!!!