शिरूर : रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत “चिमणी पाखरे” नावाचा अवैध जुगार सुरू असताना पोलिसांनी धाड टाकून कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईत आरोपीकडून जुगार खेळण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य तसेच रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशेष माहितीच्या आधारे दि.०२ ऑगस्ट रोजी ही धाड टाकण्यात आली आहे. जुगाराच्या अड्ड्यावर मटका चालवणाऱ्या व्यक्तीस ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
मात्र, या कारवाईवर अनेक स्थानिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ” सर्व दुकाने आजूबाजूला असून दुकाने तीन आणि कारवाई एक. यामुळे ही कारवाई केवळ अभिनय तर नाही ना?”, असा थेट सवाल नागरिक विचारत आहेत. अनेक जणांचे म्हणणे आहे की, अशा प्रकारचे जुगार अड्डे अनेक महिने सातत्याने सुरू असतात आणि त्यांच्यावर कारवाई होत असल्याचे केवळ एका दिवसापुरतेच दाखवले जाते.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, जर पोलीस प्रशासन खरंच कारवाईला गांभीर्याने घेत असेल, तर या अड्ड्यांची मुळाशी उखडून टाकण्याची गरज आहे. गावच्या मध्यवर्ती भागात असलेल्या अंगणवाडी शाळेजवळ वारंवार अवैध जुगार सुरू असणे, हे पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर शंका निर्माण करणारे आहे.
शाळा परिसरात सुरू असलेले जुगाराचे प्रकार, युवक आणि लहानग्यांच्या भविष्यासाठी गंभीर धोका बनत चालले आहेत. त्यामुळे केवळ कारवाईच नव्हे, तर दीर्घकालीन प्रतिबंधात्मक उपायांची मागणी जोर धरत आहे. ही कारवाई निव्वळ कागदावर मर्यादित न राहता, प्रत्यक्षात किती परिणामकारक ठरते, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे.
Add Comment