शिरूर : पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला हे गाव केवळ शेती व संस्कृतीसाठी प्रसिद्ध नाही, तर येथील श्री सोमेश्वर मंदिर या प्राचीन शिवमंदिरामुळेही विशेष ओळखले जाते. सुमारे १००० वर्षांचा इतिहास लाभलेले हे मंदिर आजही श्रध्देचे आणि स्थापत्य सौंदर्याचे प्रतीक आहे.
हे मंदिर ११व्या ते १२व्या शतकात, यादव राजवटीत बांधण्यात आले असावे, असे काही इतिहासकार सांगतात. हेमाडपंथी स्थापत्यशैलीत बांधले गेलेले हे शिवमंदिर काळ्या दगडात खोदकाम करून साकारले गेले आहे. मंदिराच्या सभामंडपातील खांबांवर असलेले कोरीव काम, धार्मिक शिल्पं आणि नंदीची शिलामूर्ती यामुळे येथे येणारा प्रत्येक भाविक थक्क होतो.

ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील नागरिकांसाठी श्री सोमेश्वर मंदिर हे आध्यात्मिक उर्जेचं केंद्र आहे. महाशिवरात्र, श्रावण सोमवार, नागपंचमी यांसारख्या पर्वांवेळी येथे हजारोंच्या संख्येने भाविक गर्दी करत असतात. अनेक वर्षांपासून येथे हरिपाठ, भजन, कीर्तन, अभिषेक आणि विविध धार्मिक उपक्रम नियमितपणे पार पडतात.
पुणे-नगर महामार्गावरून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर वसलेले हे मंदिर, रांजणगाव गणपती पासून अगदी जवळ, त्यामुळे श्रावण महिन्यात येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे.
येथील निसर्गरम्य परिसर, शांतता आणि आध्यात्मिक वातावरण हे पर्यटकांना भुरळ घालते.श्री सोमेश्वर मंदिर हे केवळ धार्मिक ठिकाण नाही, तर पुणे जिल्ह्याच्या प्राचीन सांस्कृतिक ठेव्याचे मूर्त रूप आहे. स्थापत्यशैली, इतिहास, भक्ती आणि ग्रामीण श्रद्धेचा संगम असलेले हे मंदिर पाहणे म्हणजे इतिहासाशी संवाद साधण्यासारखे आहे.
पिंपरी दुमाल्याचे हे पुण्यस्थळ भविष्यात राज्यातील एक महत्त्वाचे धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून उदयाला येईल, असा विश्वास ग्रामस्थांना आहे.
Add Comment