क्राईम ताज्या घडामोडी पुणे शिरूर

मटका आणि जुगार धंदे जोमात, प्रशासन मात्र कोमात !

शिरूर : पुणे जिल्ह्याच्या रांजणगाव गणपती येथील शाळेजवळ असलेल्या परिसरात मटका, जुगार आणि इतर अवैध धंद्यांना अक्षरशः ऊत आला आहे. गावागावांत उघडपणे सुरु असलेल्या या बेकायदेशीर धंद्यांमुळे तरुण पिढीचे भवितव्य अंधारमय होत असून, अनेक कुटुंबांचे आर्थिक आणि सामाजिक आयुष्य उध्वस्त होत आहे. तरी देखील पोलिस प्रशासन मात्र याबाबत मौन बाळगून असल्याची भावना नागरिकांत व्यक्त होत आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, गावातच मोकळेपणाने मटका आणि जुगार अड्डे सुरू असून, खेळाडूंच्या सोबतच आयोजकांचाही मनोबल दिवसेंदिवस वाढत आहे. यामागे काही ठिकाणी आर्थिक व्यवहार, राजकीय दबाव किंवा पोलिसांचा मूक आशीर्वाद असल्याची कुजबुज सुरू आहे. या धंद्यांत रोज लाखोंची उलाढाल होत असून, अनेक युवक सहज पैसे मिळवण्याच्या मोहात अडकत आहेत.

जुगाराच्या नादात घरातील दागिने, शेती, व्यवसाय आणि घरखर्चाचा पैसा पणाला लागतो. परिणामी कौटुंबिक कलह, कर्जबाजारीपणा आणि गुन्हेगारी वाढते आहे. यामुळे समाजाच्या सुरक्षिततेवर आणि गावाच्या शांततेवर गंभीर परिणाम होत आहे.

दरम्यान, या अवैध धंद्यांवर तातडीने आणि सातत्याने कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. “कारवाईचे केवळ दिखावे न करता, मूळ गाठ पकडून जुगार-मटका साखळी मोडावी,” अशी जोरदार मागणी होत आहे. पोलिसांनी तात्काळ गस्त वाढवून, जबाबदारीने कार्यवाही केल्यास परिस्थिती नियंत्रणात आणता येईल, असा नागरिकांचा विश्वास आहे.

जर अशीच निष्क्रियता राहिली, तर मटका-जुगार संस्कृती ग्रामीण भागात आणखी रुजेल आणि त्याचा फटका संपूर्ण पिढीला बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Add Comment

Click here to post a comment

Featured

error: Copying content is not allowed!!!