शिरूर : ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेल्या रांजणगाव गणपती परिसरात अवैध मटका व जुगार अड्ड्यांचा उघडपणे व्यापार सुरू असून, या धंद्यांवर कारवाईसाठी प्रशासन अजूनही पुढाकार घेत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पवित्र भूमीत अशा गैरकृत्यांचा बिमोड करण्याऐवजी प्रशासनाचे मौन अनेक प्रश्न निर्माण करत आहे.
स्थानिकांच्या मते, या अड्ड्यांना कोणाचे तरी राजकीय किंवा आर्थिक पाठबळ मिळत असल्याची शंका आहे. “आर्थिक हितसंबंध, दबाव वा संगनमतामुळे कारवाई होत नाही का?” असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. यामुळे शाळा परिसरात मटका-जुगार अड्डे उभारले जात असून, लहान मुलांच्या संगोपनावर व त्यांच्या भविष्यावर गंभीर परिणाम होत आहेत.नागरिक व पालक यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, तरुण पिढी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या विळख्यात अडकण्याचा धोका वाढला आहे.
पालकांच्या मते, प्रशासनाने जर वेळेत पावले उचलली नाहीत तर ही परिस्थिती हाताबाहेर जाणार आहे.धार्मिक वारसा आणि सांस्कृतिक ओळख जपणाऱ्या या गावाच्या पवित्रतेला कलंक लावणारे हे अड्डे तातडीने बंद करून, संबंधितांवर कठोर कारवाई करावी. तसेच हे धंदे कायमस्वरूपी बंद करण्यात यावेत अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
Add Comment