आंबेगाव ताज्या घडामोडी पुणे शिरूर

वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर; अपघातास कोण जबाबदार?

शिरूर : रांजणगाव गणपती ते करंजावणे रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. या रस्त्यालगतच अनेक भाजीपाला विक्रेते आपले स्टॉल लावून व्यवसाय करत असल्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. परिणामी, या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

भाजीपाला विक्रेत्यांनी रस्त्यालगतच ठाण मांडल्यामुळे वाहनचालकांना अरुंद रस्त्यावरून मार्गक्रमण करावे लागत आहे. दुचाकी, चारचाकी तसेच मोठ्या वाहनांना वळण घेणे कठीण झाले असून, एखादा अपघात घडल्यास त्यास जबाबदार कोण? हा प्रश्न नागरिकांमध्ये संतापाने उपस्थित केला जात आहे.

ग्रामपंचायतीने यापूर्वीही वेळोवेळी विक्रेत्यांना सूचना देऊन रस्ता मोकळा ठेवण्यास सांगितले आहे. मात्र या सूचनांकडे दुर्लक्ष करून विक्रेते पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी आपले स्टॉल लावतात. परिणामी वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे.स्थानिक नागरिक व वाहनचालक या परिस्थितीमुळे हैराण झाले असून, त्यांनी प्रशासनाकडे या विक्रेत्यांविरोधात कठोर पावले उचलण्याची मागणी केली आहे.

“एकीकडे ग्रामपंचायत सूचना देते, तर दुसरीकडे त्याची अंमलबजावणी होत नाही. उद्या अपघात झाल्यास जबाबदारी कोण घेणार?” असा सवाल नागरिक विचारत आहेत.या प्रश्नावर तातडीने उपाययोजना न झाल्यास भविष्यात गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने व पोलीस विभागाने संयुक्तरीत्या कारवाई करून रस्ता मोकळा ठेवण्याची जबाबदारी पार पाडावी, अशी मागणी जोर धरत आहे.

error: Copying content is not allowed!!!