शिरूर : रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात नोव्हेंबर २०२४ मध्ये दाखल झालेल्या एका अल्पवयीन मुलीच्या अपहरणप्रकरणी पोलिसांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे. या प्रकरणात मुलगी सुखरूप सापडली असून मुख्य आरोपीलाही ताब्यात घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे, ही कारवाई अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पार पडली असून त्यामध्ये महिला पोलिस हवालदार विद्या बनकर यांचे धाडस आणि चिकाटी विशेष कौतुकास्पद ठरले आहे.
अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्यानंतर आरोपी संतोष बालाजी मुळे (रा. खोरस, ता. पालम, जि. परभणी) याचा तपास सुरू होता. या तपासात पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि माहितीच्या आधारे आरोपी परभणी जिल्ह्यात असल्याचे निष्पन्न केले.त्यावेळी परभणी परिसरात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. अशा प्रतिकूल हवामानातही महिला हवालदार विद्या बनकर आणि पोलिस हवालदार वैभव मोरे यांनी कोणताही धोका न पाहता नदी-नाले पार करून आरोपीच्या मागावर धाड टाकली.
तपासादरम्यान संतोष मुळे याने सुरुवातीला गुन्हा कबूल करण्यास नकार दिला. मात्र रांजणगाव पोलिस स्टेशनचे पोलिस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ यांच्या तांत्रिक तपासामुळे आणि पोलिसांच्या सततच्या प्रयत्नांमुळे आरोपी व त्याचे नातेवाईक शेवटी बोलते झाले. या दबावाखाली संतोष मुळे याने अखेर गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपीकडून मिळालेल्या माहितीनुसार, अपहरण केलेली अल्पवयीन मुलगी लातूर येथे असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुलीला तेथून सुखरूप ताब्यात घेतले.
या संपूर्ण प्रकरणात विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे महिला हवालदार विद्या बनकर यांचे अतुलनीय योगदान. पूरस्थितीमध्ये जीवाची पर्वा न करता केलेल्या या कारवाईमुळे अपहरण झालेली मुलगी सुखरूप परत आली आणि आरोपीला न्यायाच्या कक्षेत आणण्यात यश आले आहे. या गुन्ह्यात बलात्कारासह बाल लैंगिक अत्याचाराचे कलमांची वाढ करण्यात आलेली असुन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिवाजी मुंढे हे करत आहेत.
रांजणगाव एमआयडीसी पोलिसांचे हे धाडस, तांत्रिक कौशल्य आणि चिकाटी खरोखरच प्रेरणादायी आहे. समाजात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी अशा पोलिस अधिकाऱ्यांचे योगदान अमूल्य असून, त्यांच्या कार्याची दखल घेणे अत्यंत आवश्यक आहे.
Add Comment