पऱ्हाड, थिटे, पवार, शिवले, उमाप, जांभळकर, गायकवाड इच्छुकांच्या यादीत.
केंदूर | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वातावरण तयार झाले आहे. निवडणूक लढविण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या क्लुप्त्यांचा वापर सुरू झाला आहे. केंदूर – पाबळ गट हा प्रभाग रचनेत पुन्हा २०१७ प्रमाणेच असणार हे निश्चित झाले आहे. या गटात प्राबल्य असलेल्या स्थानिक पुढाऱ्यांनी कंबर कसली आहे. इच्छुकांनी देखील निवडणुक लढविण्याची तयारी झाली असल्याची खात्री द्यायला सुरुवात केली आहे. केंदूर – पाबळ गटाचे नेतृत्व यापूर्वी भाजप नेत्या जयश्री पलांडे आणि मंगलदास बांदल या दोन मातब्बर नेत्यांनी केले आहे तर सर्वसामान्य शेतकऱ्यांचे नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्व. बाळासाहेब खैरे यांनी देखील या भागात जिल्हा परिषद सदस्य म्हणून नेतृत्व केले आहे.
केंदूर – पाबळ गटाला ऐतिहासिक महत्त्व आहे, ज्यामध्ये पाबळ येथील मस्तानीची कबर, जैन मंदिर त्याचबरोबर वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांचे समाधीस्थळ आणि केंदूर येथील कान्होराज महाराजांचे समाधीस्थळ अशा अनेक ऐतिहासिक स्थळांचा समावेश या जिल्हा परिषद गटात होतो.
केंदूर आणि पाबळ ही दोन गावं या गटात सर्वाधिक मतदार असलेली गावं आहेत. उमेदवारीच्या गणितात या दोन्ही गावांचा विचार करूनच कोणत्याही पक्षाला उमेदवारी ठरवावी लगते. आगामी निवडणुकीसाठी केंदूरमधून इच्छुक असलेले प्रमोद पऱ्हाड आणि सनी थिटे हे दोघेही वेगवेगळ्या पक्षातून इच्छुक आहेत. प्रमोद पऱ्हाड यांनी एकदा स्वतः आणि एकदा पत्नी सविता पऱ्हाड अशा दोन वेळा पंचायत समिती सदस्य पदाची निवडणुक जवळून अनुभवली आहे. केंदूर ग्रामपंचायतमध्ये देखील पऱ्हाड यांचा प्रभाव राहिलेला आहे. विकासकामांचा दांडगा अनुभव आणि माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे विश्वासू सहकारी म्हणून देखील परिसरात त्यांची ओळख आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीसाठी पऱ्हाड यांचा विचार होऊ शकतो. तर सनी थिटे यांच्या मातोश्री विमल थिटे यांनी केंदूर ग्रामपंचायत सरपंच म्हणून उत्तम काम केले आहे, तर एकदा पंचायत समिती सदस्य पदाची निवडणूक लढविली आहे. वडील रामशेठ थिटे यांची या भागात असलेली प्रतिमा ही थिटे यांची जमेची बाजू मानली जाते.
तर दुसरीकडे वढू बुद्रुक येथील माजी सरपंच प्रफुल्ल शिवले यांचा देखील पत्नीच्या पंचायत समिती सदस्य पदाच्या निवडणुकीचा अनुभव आहे. गेल्यावेळी पंचायत समिती सदस्य पदाची निवडणूक थोडक्या मतांनी पराभूत झाल्याने आगामी जिल्हा परिषद सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी शिवले यांनी कंबर कसली आहे. तर उज्जैनच्या महाकाल देवदर्शनासाठी रेल्वेने भाविकांना मोफत प्रवासाची सोय केल्याने प्रफुल्ल शिवले यांनी आपली श्रवणबाळ अशी ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. त्याचबरोबर कोरोना काळात स्वखर्चाने कोविड सेंटर उभारून मोफत रुग्णसेवा केल्याने परिसरात शिवले यांनी सहानुभूती कायम ठेवली आहे.
यापूर्वी अपक्ष जिल्हा परिषदेची निवडणूक लढविलेले आणि माजी पंचायत समितीचे सभापती सुभाष उमाप यांच्या देखील नावाची चर्चा उमेदवारीसाठी होत असते. त्याचबरोबर नव्यानेच या भागातील राजकारणात आपली जागा निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले विकास गायकवाड यांनी सामुदायिक विवाह सोहळ्यापासून सामाजिक कार्याचा आलेख वाढता ठेवला आहे. केंदूर – पाबळ जिल्हा परिषद गटातील ओबीसी समाजाचा चेहरा म्हणून गायकवाड यांची प्रतिमा असल्याने ही त्यांची जमेची बाजू मानली जाते. त्याचबरोबर शिरुर बाजार समितीचे माजी सभापती शंकर जांभळकर यांनी देखील आगामी जिल्हा परिषद सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी जनसंपर्क वाढवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या उमेदवारीसाठी ते प्रमुख दावेदार आहेत, तर नुकत्याच विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवार देवदत्त निकम यांचे ते विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे. शिरुर बाजार समितीचे उपकेंद्र पाबळ येथे त्यांच्याच सभापती काळात तयार झाले तर अनेक विधायक कामांसाठी ते ओळखले जातात.
माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या दुसऱ्या फळीतील मातब्बर नेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जाणारे प्रकाश पवार हे देखील या निवडणुकीच्या रिंगणात असतील. केंदूर – पाबळ जिल्हा परिषद गटात सर्वाधिक जनसंपर्क असलेले नेते म्हणून प्रकाश पवार यांची ओळख आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आत्तापर्यंत ज्यांना ज्यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली गेली त्या सर्व उमेदवारांच्या निवडणुकीत पवार यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. शिरुर तालुक्याच्या राजकारणात सर्वाधिक काळ सहकारातील प्रमुख पदांवर काम करण्याची संधी पवार यांना मिळाली आहे. गटात कार्यकर्त्यांचा मोठा संच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी त्यांचा असलेला थेट संवाद आणि या गटात असलेला त्यांचा सर्वाधिक जनसंपर्क ही त्यांची जमेची बाजू मानली जाते.
तर वरिष्ठ पातळीवर होणाऱ्या पक्षांची युती आणि आघाडी यावर पुढील निवडणुकीचे चित्र पाहायला मिळेल, परंतु आतापासूनच सर्व इच्छुक उमेदवारांनी सर्वच पक्ष वेगवेगळे निवडणूक लढवतील या दृष्टीने पाऊले टाकायला सुरुवात केली आहे. त्यामुळे केंदूर – पाबळ जिल्हा परिषद गटातून पक्षाची अधिकृत उमेदवारी कोणाला मिळते आणि या गटाचा जिल्हा परिषद सदस्य होण्याचा बहुमान कोणाला मिळतो हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.
Add Comment