जगातील बहुतेक देश आज ग्रेगोरियन दिनदर्शिकेचा अवलंब करत आहेत. परंतु आफ्रिकेतील इथिओपिया हा देश अजूनही आपली पारंपरिक आणि स्वतंत्र दिनदर्शिका वापरत आहे. या दिनदर्शिकेला इथिओपियन कॅलेंडर किंवा गेइझ कॅलेंडर असे म्हणतात. ही पद्धत जगातील इतर देशांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे आणि म्हणूनच इथिओपियातील तारखा, वर्ष व वेळेचे मोजमाप परदेशी प्रवाशांसाठी एक अनोखा अनुभव ठरतोय.
काय आहे १३ महिन्यांचे वैशिष्ट्य ?
इथिओपियन कॅलेंडरमध्ये एकूण १३ महिने असतात. यातील १२ महिने प्रत्येकी ३० दिवसांचे असतात. तर तेरावा महिना ‘पगुमे’ हा केवळ ५ दिवसांचा असतो. तसेच लीप वर्षात हा महिना ६ दिवसांचा ठरतो. या वैशिष्ट्यामुळेच इथिओपियाचे वर्णन जगभरात “13 months of sunshine” असे केले जाते.
ग्रेगोरियनपेक्षा ७–८ वर्ष मागे…
जगात वापरल्या जाणाऱ्या ग्रेगोरियन दिनदर्शिकेपेक्षा इथिओपियन दिनदर्शिका ७ ते ८ वर्षांनी मागे आहे. म्हणजेच सप्टेंबर २०२५ मध्ये जग २०२५ हे वर्ष साजरे करत असताना, इथिओपियात मात्र २०१७ वर्षाची सुरुवात होते. त्यामुळेच इथिओपिया देशात पर्यटकांसाठी तारखांचा हिशेब लावणे ही एक वेगळी कोडीसारखी गोष्ट असते.
इथिओपिया येथे वेगळे घड्याळ…
कॅलेंडरप्रमाणेच इथिओपियात वेळ मोजण्याची पद्धतही वेगळी आहे. सूर्योदयाच्या वेळी म्हणजे आपल्या वेळेनुसार सकाळी ६ वाजता, तेथील घड्याळात १ वाजता दाखवले जाते. म्हणजेच त्यांचे घड्याळ आपल्या तुलनेत नेहमीच ६ तासांनी वेगळे चालते. पर्यटकांना यामुळे सुरुवातीला गोंधळ होतो, पण स्थानिक लोकांसाठी हे अगदी स्वाभाविक आहे.
देशात नवे वर्ष व सण…
इथिओपियाचे नवे वर्ष “एनकुटाताश” म्हणून साजरे केले जाते. हा सण दरवर्षी ११ सप्टेंबर (कधी कधी १२ सप्टेंबर) रोजी येतो.या दिवशी शेतकरी पिकाच्या हंगामाचे स्वागत करत असतात. देशभर धार्मिक कार्यक्रम, सांस्कृतिक उत्सव आणि आनंदाचे वातावरण पसरते आणि हा सण फक्त नववर्षाचा नाही तर इथिओपियाच्या सामाजिक जीवनातील आशा, श्रम आणि परंपरेचे प्रतीक मानला जातो.
देशाचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व…
इथिओपियन ऑर्थोडॉक्स चर्चसाठी हे कॅलेंडर अत्यंत पवित्र मानले जाते. सर्व धार्मिक सण, उपवास व परंपरा या कॅलेंडरनुसारच निश्चित केल्या जातात.त्यामुळे ही दिनदर्शिका फक्त वेळ मोजण्याचे साधन नसून धार्मिक श्रद्धा व सांस्कृतिक ओळख जपणारे माध्यम आहे.
पर्यटकांसाठी आकर्षण अनुभव…
इथिओपिया येथे भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी हा कॅलेंडर अनुभव विलक्षण ठरत आहे. देशातील तारखा व वेळेतील फरकामुळे अनेकदा संभ्रम निर्माण होतो. मात्र त्याठिकाणाच्या नागरिकांसाठी हा त्यांच्या वारशाचा आणि परंपरेचा अभिमान आहे. आधुनिकतेच्या लाटेतही इथिओपिया आपली १३ महिन्यांची अनोखी दिनदर्शिका जपून ठेवत आहे, हेच त्याच्या सांस्कृतिक ठामपणाचे लक्षण मानले जाते.
Add Comment