क्राईम ताज्या घडामोडी पुणे शिरूर

अपहरण केलेल्या तीन वर्षीय बालकाची सुटका, आरोपी दांपत्यास अटक !

शिरूर : रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत औद्योगीक वसाहतीमध्ये कार्यरत परप्रांतीय कामगारांच्या परिसरात अपहरणाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एका तीन वर्षीय बालकाचे अपहरण करण्यात आले होते. मात्र पोलिसांकडून अपहरण केल्याचा गंभीर प्रकार उघड करण्यात आला असून आरोपींना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १२ सप्टेंबर २०२५ रोजी काजल पडघाण व त्यांचा भाऊ प्रमोद पाटील कामानिमित्ताने घराबाहेर गेले असता तीन वर्षीय आयुष आणि आरोपी पुजादेवी यादव (वय ३७) व अर्जुनकुमार यादव (वय ३६) दांपत्य अचानक गायब झाले. काही दिवस त्यांची प्रतीक्षा करण्यात आली, परंतु कोणतीही माहिती न मिळाल्याने काजल यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. तत्परतेने कार्यवाही करत पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे व त्यांच्या टीमने स्थानिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाला गती दिली.

गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणातून हे दांपत्य पंजाब राज्यातील लुधियानातील ठिकाणी पोहचले असल्याचे निष्पन्न झाले.तत्काळ रांजणगाव पोलिस तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात व सहा. फौज. दत्तात्रय शिंदे यांनी लुधियानातील स्थानिक पोलिसांच्या मदतीने पुजादेवी यादव (वय ३७) व अर्जुनकुमार यादव (वय ३६) यांना ताब्यात घेतले. त्याचबरोबर बालक आयुष याची सुखरुप सुटका करण्यात आली.

दि. १७ सप्टेंबर २०२५ रोजी आरोपी दांपत्य व अपहरीत बालक रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात हजर केल्यानंतर दोघांनीही कबूल केले की, मुलबाळ नसल्यामुळे आणि त्याच्यावर प्रेम आलेले असल्याने त्यांनी बालकास पळवून नेले होते. अपहरीत मुलगा आयुष याची आई काजल महेंद्र पडघाण यांच्याकडे सुरक्षितरीत्या सुपूर्द करण्यात आला. मुलाच्या आईच्या आनंद अश्रूंनी वातावरण भारावून गेले. नातेवाईक, शेजारी आणि ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाच्या तत्परतेचे मनापासून अभिनंदन केले.

या यशस्वी कारवाईसाठी पोलीस अधिक्षक संदीप गिल्ल, अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, सहा. फौज. दत्तात्रय शिंदे, पो.कॉ. उमेश कुतवळ, विजय सरजिने, सायबर पोलीस स्टेशनचे पो.कॉ. संकेत जाधव व लुधियानातील पोलीस निरीक्षक सुरेशकुमार रामल व गुरमित सिंग यांनी जबरदस्त मेहनत घेतली आहे. पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक श्री. अशोक चव्हाण करत आहेत. या कारवाईमुळे बालकाच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासनाचे कार्य उत्कृष्ट व प्रशंसनीय ठरले आहे.

Add Comment

Click here to post a comment

Featured

error: Copying content is not allowed!!!