शिरूर : रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवघ्या दोन दिवसांत दुसऱ्यांदा अमली पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी मोठी छापा टाकून तब्बल २८ किलो गांजा जप्त केला असून, दोन संशयित आरोपींना अटक करण्यात यश मिळाले आहे. जप्त केलेल्या गांजाची बाजारभावानुसार किंमत सुमारे सात लाख रुपये इतकी आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, शिरूर तालुक्यातील बाभुळसर खुर्द येथील सृष्टी सोसायटीमधील एका रो हाऊसमध्ये गांज्याचा साठा करून विक्रीसाठी ठेवण्यात आला असल्याचे समोर आले. त्यानुसार दोन पथकांनी कारवाई करत घरझडती घेतली असता सौ. दिव्या अतुल गिरे (२७) व सुरज दिलीप शिंदे (२८) यांच्या ताब्यातून तब्बल २८ किलो गांजा हस्तगत करण्यात आला. तपासात उघड झाले की, हा गांजा आरोपी दिव्या गिरे हिचा पती अतुल वसंत गिरे याने विक्रीसाठी आणून दिला होता. सदर आरोपी सध्या फरार असून, त्याचा शोध पोलिस घेत आहेत.
पुढील तपासात हा गांजा कोणाकडून आणण्यात आला आणि कोणाला विक्री करण्याचा त्यांचा प्रयत्न होता, याबाबत चौकशी सुरू आहे. या प्रकरणी अंमली पदार्थ नियंत्रण कायदा (NDPS Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात यांच्यासह पोलीस कर्मचारी दत्तात्रय शिंदे, विजय सरजिने, विलास आंबेकर, गणेश वाघ, उमेश कुतवळ, प्रविण पिठले, योगेश गुंड, विद्या बनकर, माऊली शिंदे, पांडुरंग साबळे, रामेश्वर आव्हाड, हेमंत इनामे यांनी केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात करीत आहेत.
Add Comment