मुंबई : शिरुर तालुक्यातील अनुभवी नेते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर (चंद्रशेखर) पाचूंदकर पाटील यांनी आज भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला आहे. मुंबई येथील पक्ष कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.
पाचूंदकर पाटील यांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रिय भूमिका बजावली होती. त्यांनी २००२ साली जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम पाहिले, तसेच राष्ट्रवादी पक्षात तालुकाध्यक्षपदाची जबाबदारीही सांभाळली होती. राष्ट्रवादी एकत्र असताना त्यांनी माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निवडणुकीतही महत्वाची भूमिका निभावली होती.मात्र, राष्ट्रवादी पक्षाचे दोन गट झाल्यानंतर त्यांनी शरद पवार गटासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर वळसे पाटील आणि पाचूंदकर यांच्यातील राजकीय मतभेद अधिक गहिरे झाले. आज अखेर पाचूंदकर यांनी वळसे पाटलांना अप्रत्यक्ष लक्ष्य करत भाजपमध्ये प्रवेश करून चर्चेचा विषय ठरले आहेत.
पाचूंदकर म्हणाले, “शिरुर तालुका सुसंस्कृत तालुका म्हणून ओळखला जातो. माजी मंत्री बाप्पूसाहेब थिटे, रावसाहेब पवार, बाबुराव पाचर्णे, पोपटराव गावडे, सूर्यकांत पलांडे यांसारख्या सुसंस्कृत नेत्यांची परंपरा आम्हाला लाभली आहे. परंतु बाहेरच्या शक्तींनी आमच्या तालुक्यातील वंचित आणि शोषित घटकांवर अन्याय करण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे या घटकांना न्याय मिळावा म्हणून मी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला,” असे ते म्हणाले.
दरम्यान, पाचूंदकर यांच्या प्रवेशामुळे रांजणगाव गणपती परिसरासह संपूर्ण शिरुर तालुक्यात भाजपला नवे बळ मिळेल, अशी प्रतिक्रिया भाजप कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.
Add Comment