Uncategorized

जिल्हा परिषद, पंचायत समिती आरक्षण सोडतची तारीख ठरली..!

शिरुर, पुणे | जिल्हा परिषद, परिषद पंचायत समिती निवडणुकीचा आरक्षण सोडत कार्यक्रमला शेवटी मुहूर्त मिळाला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने आरक्षण सोडतीसंदर्भात आज (दि. ५) रोजी तसा आदेश जारी केला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून जिल्हा परिषदेचल, पंचायत समितीच्या निवडणुकीचे बिगुल कधी वाजणार याची प्रतीक्षा सर्वांना लागली होती. इच्छुक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होते मात्र आरक्षण सोडतीची तारीख नक्की होत नसल्याने इच्छुकांचा हिरमोड झालेला पाहायला मिळत होता. मात्र जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आरक्षण सोडतीचे कॅलेंडर ठरले आहे.

राज्य निवडणूक आयोगाने २५ जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाऱ्या २८४ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आरक्षण सोडतीसंदर्भात आदेश काढला आहे. त्यामुळे अनेक महिने प्रतीक्षेत असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या इच्छुक उमेदवारांची प्रतिक्षा जवळपास संपली आहे. यामध्ये अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), आणि सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. दरम्यान गुरुवार (दि. ७) रोजी आरक्षण सोडतीचा वृत्तपत्राद्वारे कार्यक्रम प्रसिद्ध केला जाणार आहे तर बुधवार (दि. १३) रोजी अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), आणि सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. त्याचबरोबर राज्यात ओबीसी आरक्षण संदर्भात घमासान पाहायला मिळत आहे मात्र ओबीसी आरक्षण विरहित ही आरक्षण सोडत काढणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

Add Comment

Click here to post a comment

error: Copying content is not allowed!!!