Uncategorized

शिरूरच्या ३९ गावांत राष्ट्रवादीच्या प्रस्थापितांचे वर्चस्व मात्र कार्यकर्त्यांच्या इच्छा बळावल्या…!

शिरुर, पुणे | शिरुर – आंबेगाव विधानसभा मतदार संघातील शिरुरच्या ३९ गावांमध्ये सातत्याने राजकीय चुरस पहायला मिळत आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बहुतांश नेत्यांमध्ये आता सुसंवाद आढळून येत नाही. त्याच धर्तीवर टाकळी हाजी ग्रामपंचायतचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक प्रस्थापितांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. अनेक वर्षे राजकारणात सोबत असलेले माजी आमदार पोपटराव गावडे आणि माजी सरपंच दामू घोडे यांच्यातील राजकीय वाद वाढला आणि गावडे यांना ग्रामपंचायतच्या सत्तेपासून घोडे यांनी दूर ठेवले आहे. त्यामुळे प्रस्थापितांच्या सत्तेतील खुर्च्या रिकाम्या करण्याचं काम घोडे दाम्पत्याने यशस्वीपणे केले असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे नेत्यांचे वर्चस्व असले तरीही पक्षातील कार्यकर्त्यांच्या इच्छा बळावल्या आहेत.

शिरूरच्या याच ३९ गावांची तीन वेगवेगळ्या जिल्हा परिषद गटात विभागणी झाली आहे. तीनही जिल्हा परिषद गटाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तीन प्रस्थापित कुटुंबांनी आपल्याकडे कायम ठेवले आहे. टाकळी हाजी जिल्हा परिषद गटाचे नेतृत्व माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या कुटुंबाकडे तर केंदूर – पाबळ (नवीन करंदी – कान्हूर मेसाई) जिल्हा परिषद गटाचे नेतृत्व प्रकाश पवार यांच्या नेतृत्वाखाली आहे आणि रांजणगाव गणपती – कारेगाव गटाचे नेतृत्व पाचूंदकर कुटुंबाकडे आहे. आज हे तीनही कुटुंब शिरुरच्या राजकारणात प्रस्थापित मानले जातात. मात्र यापैकी गावडे कुटुंबासमोर माजी सरपंच दामू घोडे आणि विद्यमान सरपंच अरूणा घोडे या दाम्पत्याने तगडे आवाहन उभे करून ग्रामपंचायत निवडणुकीत प्रचंड यश मिळवत पोपटराव गावडे यांच्या पॅनेलला पराभवाची धूळ चाखायला लावली आहे. परिणामी आगामी निवडणूकितही कदाचित हाच विरोध पहायला मिळेल अशी कुजबुज मतदार करत आहेत.

आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकी बाबत अद्याप स्पष्टता नसतानाही रांजणगाव गणपती – कारेगाव गटात आणि केंदूर – पाबळ गटात मात्र इच्छुक उमेदवारांचा प्रचाराचा जोर कायम आहे. ग्रामपंचायतचे सरपंच ते वीस वर्षांहून अधिक कार्यकाळ शिरुर बाजार समितीच्या संचालक पदावर असलेले प्रकाश पवार सर्वाधिक काळ सभापती देखील राहिले आहेत. घोडगंगा सहकारी साखर कारखान्यावर देखील चेअरमन अशोक पवार यांच्या खालोखाल व्हाईस चेअरमन राहिलेल्या प्रकाश पवार यांचेच वर्चस्व आहे. पंधरा वर्षांहून अधिक कार्यकाळ जिल्हा दूध संघाच्या संचालिका राहिलेल्या प्रकाश पवार यांच्या थोरल्या भावजय केशरबाई पवार या विध्यमान चेअरमन आहेत. तर आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी देखील प्रकाश पवार इच्छुक आहेत. तिकडे रांजणगाव गणपती – कारेगाव गटात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शेखर पाचूंदकर त्याचबरोबर ग्रामपंचायतचे उपसरपंच ते गेल्या दहा वर्षांपासून सलग दोन टर्म शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राहिलेले मानसिंग पाचूंदकर हे उपसभापती देखील राहिलेले आहेत त्याचबरोबर युवक राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष ते आता शिरुर – आंबेगाव विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी पक्षाचे ते अध्यक्ष देखील आहेत. हेही आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत आहेत. तर टाकळी हाजी गटाचे नेतृत्व जिल्हा परिषदेच्या इतिहासातील सर्वाधिक काळ गावडे कुटुंबाकडेच आहे.

तर या सर्वाधिक काळ राजकाणात प्रस्थापित म्हणून गणल्या जाणाऱ्या गावडे, पवार, पाचूंदकर कुटुंबाला शह देण्यासाठी शिवसेना, भाजपचा कस लागणार आहे. त्यातच राष्ट्रवादी पक्षातील अंतर्गत संवाद देखील या प्रस्थापितांच्या खुर्च्या रिकाम्या करण्यात अग्रेसर असणार आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे पक्षातील कार्यकर्ते आणि नेत्यांमधील आखूड झालेला संवाद पुन्हा पूर्वपदावर आणण्याची गरज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आहे. रांजणगाव गणपती – कारेगाव गट सोडला तर टाकळी हाजी आणि केंदूर -पाबळ हे दोनही गट थोड्या थोड्या फरकानेच विजयी झाले आहेत. त्यामुळे प्रस्थापित नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची सांगड घालून आगामी निवडणुकांना सामोरे जाणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी महत्त्वाचे काम असणार आहे.

error: Copying content is not allowed!!!