Uncategorized

कारेगावच्या सरपंच निर्मला नवलेंसह एक सदस्य अपात्र.

शिरुर, पुणे | शिरुर तालुक्यातील अत्यंत महत्वाची आणि सर्वाधिक उत्पन्न त्याचबरोबर पुणे – नगर महामार्गावर असलेली ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या कारेगाव ग्रामपंचायतच्या सरपंच निर्मला शुभम नवले आणि ग्रामपंचायत सदस्य प्रियांका संदीप गवारे यांनी गायरान क्षेत्रावर अतिक्रमण केल्याने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दोन्ही पदाधिकाऱ्यांचे ग्रामपंचायतचे सदस्य पद अपात्र ठरवले आहे.


माजी सरपंच अनिल उर्फ किसन नवले यांनी सरपंच निर्मला शुभम नवले यांच्या विरोधात सरकारी गायरान क्षेत्रावर अतिक्रमण केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी अर्ज केला होता. सरपंच निर्मला शुभम नवले यांनी युक्तिवाद करताना गायरान क्षेत्रावर केलेल्या अतिक्रमणाचा कुठलाही संबंध नसल्याने नमूद केले होते. त्याचबरोबर हे अतिक्रमण सासरे म्हणजेच पती शुभम नवले यांचे वडील यांच्या नावे आढळून येते त्याचा कुठलाही लाभ मी घेत नाही, शिवाय संबंधित अतिक्रमण क्षेत्र २०१३ साली दुसऱ्या व्यक्तीस बक्षिसपत्रनुसार हस्तांतरित केले आहे. रेशनकार्ड देखील विभक्त आहे. शिवाय शिरुरच्या तहसीलदार यांनी मंडल अधिकारी यांच्या मार्फत केलेल्या चौकशीनुसार देखील अतिक्रमण नसल्याचा चौकशी अहवाल सादर केला होता. अर्जदार हे कारेगाव ग्रामपंचायतचे मतदार नसून वडगाव शेरी येथील मतदार आहे, त्यामुळे त्यांचा अर्ज ग्राह्य धरू नये. असे नमूद केले होते.

परंतु जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी निकाल देताना कागदपत्रांची पडताळणी केली असता सदर मिळकत ही जुलै २०२२ पर्यंत सरपंच निर्मला नवले यांचे पती शुभम नवले यांच्या नावे दिसून येते. शासकीय गायरान जमीन ही बक्षिसपत्राने हस्तांतरित करता येऊ शकत नाही. जमिनीचे हस्तांतरण हे बेकायदेशीर आहे. त्याचबरोबर संबंधित अतिक्रमण क्षेत्राला होत असलेल्या वीजपुरवठा बिल देखील पती शुभम नवले यांच्याच नावे असल्याचे आढळून आले. दरम्यान सरपंच निर्मला नवले यांचे सासरे यांनी अतिक्रमण केले पर्यायाने पुढे वारसाहक्काने पती शुभम नवले यांच्या नावे सदर अतिक्रमण दिसून येत असल्याने कुटुंबातील सदस्य या अतिक्रमणाचा लाभ घेत असल्याचे नमूद करत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सरपंच निर्मला शुभम नवले यांचे सरपंच पद आणि सदस्य पद रद्द केले आहे.

त्याचप्रमाणे भारत आबा नवले यांनी ग्रामपंचायत सदस्य प्रियांका संदीप गवारे यांच्या विरोधात देखील गायरान क्षेत्रावर अतिक्रमण केले असल्याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. त्याप्रमाणे अतिक्रमण गायरान क्षेत्र हे स्वतःच्या मालकीचे असल्याचे नामनिर्देशन पत्रासोबतच्या शपथपत्रात नमूद असल्याचे दिसून आल्याने ग्रामपंचायत सदस्य प्रियांका संदीप गवारे यांचे देखील ग्रामपंचायत सदस्य पद रिक्त करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

error: Copying content is not allowed!!!