Uncategorized

नारायण राणेंनी केले ‘शिरुर मल्लसाम्राट’ स्पर्धेचे कौतुक, लोगोचे अनावरण…!

पुणे | दर वर्षी प्रमाणे यावर्षी देखील मोठ्या उत्साहात ‘शिरूर तालुका मल्लसाम्राट’ स्पर्धा होणार आहे, यावर्षी आंबळे या गावाला स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी मिळाली आहे. आज (शुक्रवार, २०) पुणे येथे केंद्रीय सूक्ष्म ,लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते ‘शिरूर तालुका मल्ल सम्राट स्पर्धा २०२३ आंबळे’ या स्पर्धेच्या ‘लोगो’चे अनावरण करण्यात आले.

गेली १९ वर्ष अखंडित पणे सुरु असलेली स्पर्धा यंदा २० व्या वर्षात पदार्पण करत आहे. ही स्पर्धा शिरुर तालुक्यातील मल्लांना एक चांगले व्यासपीठ उपलब्ध करून देत असते. यंदाच्या वर्षी ही स्पर्धा शिरूर तालुक्यातील आंबळे या गावात भरणार आहे. ही स्पर्धा १०,११ व १२ फेब्रुवारी रोजी होणार आहे. गेल्या वर्षी रांजणगाव गणपती याठिकाणी ही स्पर्धा माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर यांच्या माध्यमातून भरविण्यात आली होती.
दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षी देखील ‘शिरूर मल्ल सम्राट’ हा किताब जिंकणाऱ्या मल्लास चांदीची गदा व बुलेट दुचाकी व रोख स्वरुपात बक्षिस देण्यात येणार आहेत. तरी उपविजेत्या मल्लास दुचाकी व रोख स्वरुपात बक्षिस देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे महिला विभागातील खुल्या गटातील विजेत्या महिलेस स्कुटी, चांदीची गदा व रोख स्वरूपात बक्षिसे देण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

या लोगोचे अनावरण करताना नारायण राणे म्हणाले ” अशा प्रकारच्या कुस्ती स्पर्धा प्रत्येक तालुक्यात व्हाव्यात. जेणेकरून तळागाळातील मल्लांना चांगली संधी प्राप्त होईल. यावेळी आयोजकांचे देखील कौतुक राणे यांनी केले. या अनावरण प्रसंगी पुणे शहर भारतीय जनता पार्टीचे चिटणीस सचिन सातपुते , ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाचे शिरूर तालुका प्रमुख रामभाऊ सासवडे, पुणे शहर भाजप वाहतूक आघाडीचे जिल्हाध्यक्ष आशिष देशमुख, स्पर्धेचे आयोजक अविनाश संकपाळ, आंबळे गावचे सरपंच सोमनाथ बेंद्रे, शिरूर तालुका कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष दीपक वाघचौरे, आप्पासाहेब धुमाळ, महेश बेंद्रे, गणेश बेंद्रे, दादासाहेब चव्हाण व हर्षद देशमुख उपस्थित होते.

error: Copying content is not allowed!!!