शिक्रापूर, पुणे | जिल्हा परिषदेच्या निवडणुका लांबणीवर पडल्या असल्या तरी ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे. शिरुर – आंबेगाव विधानसभा मतदार संघात असणाऱ्या ३९ गावांतील जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेचाच असणार, असे मत जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका लांबणीवर पडल्या असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांनी आपापल्या तलवारी म्यान केल्या असल्या तरी दुसरीकडे मात्र ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ पक्षाकडून जोरदार तयारी सुरू केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथे माजी सरपंच समाधान डोके यांनी विविध क्षेत्रात आपला ठसा उमटविणाऱ्या विशेष व्यक्तींचा सन्मान आयोजित केला होता. यावेळी दर वर्षी सामूहिक विवाह सोहळा आयोजित करणारे विकास गायकवाड यांचा देखील सन्मान करण्यात आला.
दरम्यान तालुका प्रमुख गणेश जामदार यांनी बोलताना जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक असलेले विकास गायकवाड यांच्या कार्याचे कौतुक करत शिवसेना पक्षात प्रवेश करण्याचे आवाहन केले, त्याचबरोबर “आगामी केंदूर – पाबळ गटाचा जिल्हा परिषद सदस्य देखील तुमच्या रूपाने शिवसेनेचाच होईल” अशी खात्री देखील त्यांनी व्यक्त केली. टाकळी हाजी गटात देखील आम्ही जोमाने कामाला लागलो असल्याचे जामदार यांनी सांगितले. माजी आमदार पोपटराव गावडे यांना नेहमी आठ – दहा हजारांनी निवडून येण्याची सवय होती, मात्र टाकळी हाजी गटात गेल्यावेळी केवळ दोनशे मतांनी आमचा पराभव झाला आहे. परंतु पुढील काळात त्या गटात शिवसेनेचाच जिल्हा परिषद असणार आहे. त्यामुळे केंदूर -पाबळ गटात देखील विकास गायकवाड यांच्या रूपाने शिवसेनेचाच जिल्हा परिषद सदस्य असेल अशी अपेक्षा जामदार यांनी व्यक्त केली.
पुढे युवासेना जिल्हा प्रमुख संदीप शिंदे बोलताना म्हणले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटात सामील झालेल्या पदाधिकाऱ्यांना बाळासाहेब ठाकरेंच्या फोटो शेजारी उभं राहण्याची आता लाज वाटू लागली आहे, कारण फसवण्याची हद्द त्यांची संपली आहे. त्याचबरोबर संदीप शिंदे यांनी नाव न घेता थेट माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावरही टीका केली ते म्हणाले “आपले जे माजी होते त्यांची हकालपट्टी झाल्याची जी बातमी आली होती तीच योग्य होती, त्यांच्या लायकीनुसारच ती बातमी होती”. दरम्यान रविंद्र गायकवाड, जयदीप ताठे, कांताराम नप्ते, रेवणनाथ गायकवाड, अशोक वाघ, रवींद्र नप्ते, शंतनू जाधव यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रदीप खेडकर, विठ्ठल उमाप, वैभव महाराज झेंडे, गणेश मासळकर यांसह अनेक विशेष व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.
Add Comment