शिरुर, पुणे | शिरुर तालुक्यातील सर्वाधिक अधिकारी घडवणाऱ्या पिंपळे खालसा गावच्या जिल्हा परिषद शाळेची परंपरा याही वर्षी पाहायला मिळत आहे. यावर्षी देखील तब्बल २५ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केले आहे. त्याचबरोबर २ विध्यार्थीनींनी राज्य गुणवत्ता यादीत आपला ठसा उमटवला आहे.
दरम्यान या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका सुशीला माकर आणि शिक्षक दिनेश निघोजकर यांना ग्रामस्थांनी बक्षिसांची वर्षाव केला आहे. शिक्षिका सुशीला माकर यांना चारचाकी गाडी, रोख रक्कम, सोन्याची अंगठी ग्रामस्थांनी दिली. तर शिक्षक दिनेश निघोजकर यांना बुलेट दुचाकी, रोख रक्कम ग्रामस्थांनी दिले. त्याचबरोबर गेल्यावर्षी देखील शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन करणाऱ्या शिक्षिका रंजना कांदळकर यांना दुचाकी तर शिक्षक अण्णासाहेब गैंद यांनाही दुचाकी बक्षीस यावेळी देण्यात आली. दरम्यान या दोन्ही शिक्षकांनी कोरोनाच्या काळात शाळा बंद असतानाही विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी पूर्ण केली. त्यामुळे त्यांचे ग्रामस्थ कौतुक करत आहेत.
दरम्यान यापूर्वी अशाच शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांना तब्बल ८ चारचाकी गाड्या आणि १० दुचाकी देण्यात आल्या आहेत. त्यामुळे हीच परंपरा कायम ठेवणाऱ्या यावर्षीच्या शिक्षकांचे देखील पिंपळे खालसा येथील ग्रामस्थांनी या शिक्षकांचे अशा प्रकारे कौतुक केले आहे.
यावेळी रांजणगाव गणपती ट्रस्टच्या अध्यक्षा स्वाती पाचुंदकर, मा. जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर, शिरुर – आंबेगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, मा. पंचायत समिती सदस्य विक्रम पाचुंदकर, सरपंच अश्विनी धुमाळ, उपसरपंच दीपक शेळके, मा. सरपंच समीर धुमाळ, मा. सरपंच विशाल धुमाळ यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
Add Comment