Uncategorized

वाजेवाडी गावावर पालकमंत्र्यांचं विशेष लक्ष..!


शिरुर, पुणे | वाजेवाडी (ता. शिरूर) गाव युती सरकारच्या काळात तत्कालीन पालकमंत्री गिरीष बापट यांनी दत्तक गाव योजनेत सहभागी करून विविध विकासकामांना प्राधान्य दिले होते. त्यानंतर आता पालकमंत्री चंद्रकांत पाटील देखील वाजेवाडी गाव दत्तक घेणार असल्याचे माजी उपसरपंच अमित सोनवणे यांनी सांगितले.

वाजेवाडी गावच्या यात्रेचे निमंत्रण देण्यासाठी माजी उपसरपंच अमित सोनवणे यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. यावेळी पालकमंत्र्यांनी यात्रेचे निमंत्रण स्वीकारले आणि सोनवणे यांच्या घरी जेवणासाठी येणार असल्याचे कबूल केले. त्याचबरोबर सोनवणे यांनी वाजेवाडी गावची ओळख करून देताना गिरीष बापट यांनी गाव दत्तक घेतल्याची आठवण करून दिली. यावर चंद्रकांत पाटील यांनी ‘मी देखील तुमचं गाव दत्तक घेतो, गावासाठी काय पाहिजे याची यादी तयार करा’ अशा सूचना यावेळी दिल्या असल्याचे सोनवणे यांनी सांगितले.

दरम्यान अवघी दोन हजारच्या आसपास लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतचा कायापालट करण्यासाठी गिरीष बापट यांनी विशेष लक्ष केंद्रित केले होते. बापट यांचे स्वीय सहाय्यक अमित सोनवणे यांनी गाव दत्तक योजनेसाठी त्यावेळी विशेष प्रयत्न केले होते. दरम्यान या बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप सरकारच्या कार्यकाळात पुन्हा चंद्रकांत पाटील पालकमंत्री असल्याने आम्ही विशेष पाठपुरावा करून पुन्हा गावच्या विकासासाठी पालकमंत्र्यांचे वाजेवाडी गावाकडे विशेष लक्ष वेधून घेणार असल्याचे सोनवणे यांनी सांगितले.

error: Copying content is not allowed!!!