शिरूर : महाराष्ट्रात गुटखा विकल्यास तुम्हाला दीर्घकाळ तुरुंगात राहावे लागू शकते. राज्यात बंदी असलेला गुटखा विक्री अजामीनपात्र गुन्हा म्हणून वर्गीकृत करण्यात येईल, असे महाराष्ट्र सरकारने २०१८ साली विधान परिषदेत सांगितले आहे. असे केल्यास तुरुंगवासाची शिक्षा तीन वर्षांपर्यंत वाढवली जाऊ शकते, असे सरकारने स्पष्ट केले आहे.
गुटखाविरोधी कायदा लागू असतानाही चवदार तंबाखूच्या मिश्रणाची जोरदार विक्री पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यात केली जात आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) नाकावर टिच्चून ही विक्री होत असताना पोलीस व प्रशासन मात्र याकडे पूर्णतः दुर्लक्ष करत आहे. शिरूर तालुक्यातील छोट्या छोट्या पान टपरी, दुकाने, इतर ठिकाणी सर्रासपणे दिवसाढवळ्या गुटखा पुरवठा सुरू आहे. मात्र शिरूर तालुक्यातील शिरूर, रांजणगाव एमआयडीसी परिसर, शिक्रापूर, सणसवाडी, कोरेगाव भीमा आणि तालुक्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्री होत आहे. शिरूर तालुक्यातील शिरूर पोलीस स्टेशन रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन आणि शिक्रापूर पोलीस स्टेशन या तीनही हद्दीमध्ये गुटखा नक्की येतो कुठून असा देखील सवाल उपस्थित होत आहे. पंचतारांकित असलेल्या रांजणगाव एमआयडीसी येथे मोठ्या प्रमाणावर कामगार वसाहत आहे. त्याचप्रमाणे या भागात अनेक ठिकाणाहून गुटखा अवैधरित्या येत असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तसेच हा गुटखा विविध भागात पोहोचवला जात असून यावर कुणाचेही लक्ष नसल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे महाराष्ट्रात गुटखाबंदी केली खरी मात्र त्यावर खरच बंदी झाली आहे का असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. आरोग्यास हानिकारक असलेल्या गुटखा विरोधात महाराष्ट्र राज्याने घेतलेले हे पाऊल खरंच योग्य आहे की फक्त दिखावा असा मोठा सवाल शिरूरकरांच्या समोर उभा राहत आहे. गुटखाविरोधी कायद्यात सुधारणा झाल्यानंतर दोषी आढळणाऱ्यांना तीन वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे.












Add Comment