Uncategorized

महागणपतीच्या द्वारयात्रेसाठी प्रशासन सज्ज !

रांजणगाव गणपती ( शिरूर ) : अष्टविनाकांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र रांजणगाव येथील महागणपतीची दरवर्षीप्रमाणे भाद्रपद द्वारयात्रेला सुरुवात होणार आहे. या यात्रेसाठी देवस्थानच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात येत आहे. या द्वारयात्रेसाठी राज्यातून तसेच देशभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात.

नवसाला पावणारा गणपती म्हणजेच श्री क्षेत्र रांजणगावचा महागणपती, अशी भाविकांची श्रद्धा आहे. अष्टविनाकांपैकी एक असलेल्या रांजणगाव येथील महागणपतीच्या द्वार यात्रेचा उत्सव येत्या बुधवार ( दि. ०४/०९/२०२४ ) रोजी सुरुवात होणार असून मंगळवार ( दि.१०/०९/२०२४ ) समाप्त होणार आहे. या यात्रेदरम्यान महागणपतीच्या मूर्तीची पालखी चार दिवसांत गणपतीच्या बहिणींना आणण्यासाठी देवाची पालखी जात असते. पहिल्या दिवशी पूर्वद्वार कडे असलेल्या करडे गावातील मांजराई देवीकडे पालखीचे प्रस्थान होत असते. पहिल्या दिवशी पालखीचे मानकरी हे पाचुंदकर आळी असतात. दुसऱ्या दिवशी दक्षिण द्वार असलेल्या निमगाव म्हाळुंगी येथील आसराई ( शिरसाई ) देवीकडे पालखीचे प्रस्थान होते. यावेळी पालखीचे मानकरी माळी आळी असतात, तर तिसऱ्या दिवशी पश्चिम द्वार असलेल्या गणेगाव खालसा येथील ओझराई देवीकडे पालखीचे प्रस्थान होते. यावेळी पालखीचे मानकरी लांडे आळी हे असतात. तर चौथ्या दिवशी उत्तरद्वार असलेल्या ढोक सांगवी येथील मुक्ताई देवीकडे पालखीचे प्रस्थान होत असते. यादिवशी पालखीचा मान शेळके आळी यांचा असतो. या चार दिवसांत महागणपीच्या मूर्तीस स्पर्श करून दर्शन भाविकांना घेता येत असते. त्याचनंतर इतर दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट यांनी आयोजन केलेले आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी सोई सुविधा देखील उपलब्ध करण्यात आले असून यात महिलांसाठी विशेष हिरकणी कक्ष उभारण्यात आलेले आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांचा देखील फौज फाटा उभारण्यात येणार, तसेच भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, तसेच वाहन पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. यात देवस्थान ट्रस्ट, महसूल विभाग, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग आणि प्रशासन सज्ज झालेले आहे. यात्रा काळात भाविकांनी मोठ्या संख्येने महागणपतीच्या दर्शनासाठी यावे असे आवाहन देखील देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले असल्याची माहिती अध्यक्षा स्वाती पाचुंदकर यांनी दिली आहे.

तसेच देशभरातून येणाऱ्या भाविकांची योग्यरित्या सोई सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत. देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त ओमकार देव, अध्यक्षा स्वाती पाचुंदकर, उपाध्यक्ष संदीप दौंडकर, सचिव तुषार पाचुंदकर, खजिनदार विजय देव यांची युद्ध पातळीवर तयारी सुरू आहे.

Featured

error: Copying content is not allowed!!!