Uncategorized

३-२-१ ! मविआची शिरूरच्या सहा विधानसभेची गणितं ठरली ?

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक यंदा चांगली रंगतदार होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या सहा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ), शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) आणि काँग्रेस पक्षाच्या जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित करण्यात आले आहे. 

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील पक्षांनी महायुतीला धक्का दिला आहे. लोकसभेला जो निकाल पाहता पुढे याचीच विधानसभेला पुनरावृत्ती करण्यासाठी मविआ सज्ज झाली आहे. एकीकडे महाराष्ट्र भर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांचा झंझावात सुरू आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे उध्दव ठाकरे यांनी देखील ‘गद्दारांना गाडा’ हा निर्धार घेऊन महाराष्ट्रात प्रचार दौरे सुरू आहे. अशातच महाराष्ट्रात सर्वात चर्चेला असणारा शिरूर लोकसभा मतदारसंघ आहे. यात जुन्नर, खेड – आळंदी, आंबेगाव – शिरूर, हडपसर, शिरूर – हवेली आणि भोसरी असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघाचा विधानसभेचा जागावाटपाचा फॉर्म्युला मविआने जवळपास निश्चित केले आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) गटाला तीन, शिवसेना ( उबाठा) गटाला दोन आणि काँग्रेसला पक्षाला एक जागा असे जागावाटपाचे गणित असू शकते. 

जुन्नर विधानसभा मतदारसंघ

पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असून जुन्नर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार आहे. मात्र मविआतील राष्ट्रवादी ( शप ) गट जुन्नर विधानसभा स्वतःकडे घेण्यासाठी आग्रही असणार आहे. मात्र या जागेसाठी राष्ट्रवादी आग्रही असणार आहे. ऐनवेळी काँग्रेस पक्षाशी तडजोड करून संभाव्य उमेदवाराचा प्रवेश करून शरद पवार विधानसभा निवडणूकीत ताकद लावू शकतात. मात्र जुन्नरची उमेदवारी मिळाली नाही तर येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला जागा मिळण्याची शक्यता आहे. 

आंबेगाव – शिरूर विधानसभा मतदारसंघ

गेल्या कित्येक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व असलेल्या आंबेगाव – शिरूर विधानसभा मतदारसंघ यावेळी विधानसभा निवडणुकीत चांगला चर्चेला आहे.  राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पवारांचे विश्वासू असलेले सहकारमंत्री आमदार दिलीपराव वळसे पाटील यांनी अजित पवारांसोबत गेल्याने आंबेगाव – शिरूर मतदारसंघात पोकळी निर्माण झाली होती. मात्र पवारांवर प्रेम करणाऱ्या मतदारांमुळे पक्षाला पुन्हा ताकद मिळाल्याने हा मतदारसंघ राष्ट्रवादी शरद पवार गटाला मिळण्याची शक्यता जास्त आहे.

खेड – आळंदी विधानसभा मतदारसंघ

पुणे जिल्ह्यातील औद्योगिक वसाहत असणाऱ्या खेड तालुक्यातील राजकारण नेहमी शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या भोवती फिरत आहे. खेड – आळंदी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कायम आघाडीवर राहिली आहे. विद्यमान आमदार दिलीप मोहिते यांनी राष्ट्रवादी फुटीनंतर शरद पवारांना सोडून अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पवारांच्या राष्ट्रवादीला कायमच टक्कर देणारे ठाकरेंचे शिवसैनिक यांना उमेदवारी मिळण्याची आशा जास्त बळावली. मात्र राष्ट्रवादी ( शप ) गटात वाढते प्रवेश आणि नागरिकांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणावर आहे. दिलीप मोहिते यांचे परस्परविरोधी भाजपमध्ये एकेकाळी असणारे अतुल देशमुख यांनी ऐन लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीत ( शप ) प्रवेश केल्याने पक्षाची ताकद आणखी वाढली आहे. यामुळे खेड – आळंदी विधानसभा मतदारसंघ शरद पवार हा मतदारसंघ सोडणार नसल्याचे दिसत आहे. 

शिरूर – हवेली विधानसभा मतदारसंघ

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडल्यामुळे पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी कमकुवत झाली होती. मात्र अजित पवार यांचे जवळीक असताना देखील शिरूरचे आमदार अशोक पवार यांनी शरद पवारांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि जिल्ह्यात फक्त एकच शिलेदार पवारांसोबत राहिला. त्यामुळे साहजिकच या जागेची कोणतीही तडजोड मविआत होणार नाही असे चित्र आहे.

हडपसर विधानसभा मतदारसंघ

हडपसर विधानसभा मतदारसंघ हा शिरूर लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. या मतदारसंघात नेहमीच युतीचे वर्चस्व राहिलेले आहे. माञ २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस यांची समीकरणे आणि शरद पवारांबाबत असलेली सहानुभूती यामुळे राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे यांनी युतीचे उमेदवार यांचा २८२० मतांनी पराभव केला होता. मात्र विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार ) चा आमदार असल्याने या जागेसाठी शरद पवार आग्रही असतील. तसेच हडपसर हा शहरी भाग असल्याने शिवसेना आणि भाजप नेहमीच अग्रेसर राहिले आहे. तरीही विद्यमान राष्ट्रवादीचा विद्यमान आमदार असताना जर ही जागा पवारांना मिळाली नाही तर, मविआ तील मित्रपक्ष असलेले शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) यांचा असलेला को वोटर यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ही जागा सेनेला मिळण्याची शक्यता आहे.

भोसरी विधानसभा मतदारसंघ

हडपसर प्रमाणेच भोसरी विधानसभा मतदारसंघ हा शहरी भाग असल्याने शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांना नेहमीच अग्रेसर राहिले आहे. मात्र याला मध्यंतरी छेद देण्याचा काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विलास लांडे यांच्या माध्यमातून केले होते. परंतु झालेली चुका लक्षात घेता पुन्हा युतीने त्यांचा उमेदवार निवडून आणला आणि शहरी मतदार शिवसेना व भाजप विचारांचे असल्याचे सिद्ध झाले आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी ( शप ) पक्ष देखील या जागेची मागणी करणार असून यासाठी अजित पवार गटातील काही नेते शरद पवार गटात येण्याचा आग्रह करताना पाहायला मिळत आहे. मात्र प्रत्येक निवडणुकीत शिवसेना यांना जास्त मतदारांची पसंती मिळत आहे. तसेच शिवसेनेत फूट पडल्यामुळे मतदारांची महायुतीवर असणारी नाराजी, तसेच शिवसेनेत ( उबाठा ) असणाऱ्या पदाधिकारी व पक्षात झालेले तगड्या कार्यकर्त्यांचे प्रवेश पाहता राष्ट्रवादीपेक्षा शिवसेना ( उबाठा ) पक्ष यांना भोसरी विधानसभा निवडणुकीत जागा मिळण्याची मोठी शक्यता आहे.

या सहा विधानसभा मतदारसंघात २०२४ च्या निवडणुकीत महाविकास आघाडी शिरूर लोकसभा निवडणुकीत ३-२-१ याप्रमाणे जागा वाटप करून निवडणूक लढवतील असे दिसून येत आहे. तसेच यासाठी खासदार डॉ अमोल कोल्हे यांचा देखील या राजकीय जागावाटपाच्या गणितीय सुत्राला दुजोरा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीत शिरूर लोकसभा मतदारसंघात नक्की कोणाचे वर्चस्व राहणार आहे, हे येणारा काळ ठरवणार आहे.

Featured

error: Copying content is not allowed!!!