शिरूर : जिद्द, चिकाटी, आणि मेहनत असेल तर या जगात काहीही अशक्य नाही. भारत हा पुरुषप्रधान देश आहे. या देशात पुरुषांना करिअर घडवण्यासाठी आयुष्यातील बराच वेळ कुटुंब देत असतात. मात्र त्याच धर्तीवर स्त्रियांना यात अनेक बंधन आहेत. याच बंधनांना काही स्त्रिया झुगारून आपलं अनोखं विश्व निर्माण करत आहे. याचच एक उदाहरण म्हणजे आरती दसगुडे.
पुणे जिल्ह्याच्या शिरूर येथील एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील आरती राम दसगुडे या तरुणीची महाराष्ट्र महिला क्रिकेट संघामध्ये निवड झाल्याने तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. बीसीसीआयतर्फे आयोजित सीनिअर महिलांच्या टी २० करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ पुणे येथे मंगळवारी जाहीर झाला. त्यात आरतीची निवड करण्यात आली आहे.
आरतीचा जन्म एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला आहे. दसगुडे दाम्पत्य हे आज देखील शेतकरी कुटुंब असल्याने आज ही कष्ट करत आहेत. मात्र मुलीने पाहिलेले स्वप्न आणि ते पूर्ण करण्यासाठी वडील राम यांनी केलेला पण आज खऱ्या अर्थाने पुर्ण झालं आहे. आरती ही गेली अनेक वर्षे शिरूर स्पोर्ट क्लब येथील क्रिकेट प्रशिक्षक आशिष ( लखन ) कोळपकर यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे धडे गिरवत होती. सुरुवातीला पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत होणारे क्रिकेट सामने आरतीने उत्तमरीत्या आपल्या गोलंदाजीतून फलंदाजांना चारी मुंड्या चीत केले आहेत. अनेकदा तिने समोरच्या फलंदाजाला मैदानावर स्थिर होण्याअगोदर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे. आरती हिने क्रिकेट मध्ये सातत्य ठेवले आणि आज महाराष्ट्राच्या महिला क्रिकेट संघात तिची निवड झाली आहे.अखेर यंदाच्या वर्षी तिने यशाला गवसणी घातली व शिरूर शहरासह तालुक्यातून राज्य पातळीवर खेळणारी ती पहिली तरुणी ठरली आहे.
आरती आज सीनिअर महिलांच्या टी २० करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्राकडून खेळत आहे. दुपारी एक वाजता कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर पाँडिचेरी विरुद्ध महाराष्ट्र या दोन संघात क्रिकेटचा सामना रंगणार आहे.
गेल्या अनेक वर्षापासून क्रिकेटचे प्रशिक्षण घेत होते. यावेळी जिद्द आणि चिकाटीने अनेक स्पर्धा गाजवल्या आहे. शालेय स्पर्धा इंटर कॉलेज स्पर्धा यामध्ये चांगला खेळ दाखवला आहे. परंतु राज्य व देशाकडून खेळण्याची माझी इच्छा होती. त्यासाठी मी शंभर टक्के देत होते. परंतु ध्येयापर्यंत जाऊ शकत नव्हते. अखेर यंदा हे ध्येयमी पूर्ण करून महाराष्ट्र संघात स्थान मिळवले आहे. याचे सोने करून देशाच्या महिला क्रिकेट संघात स्थान मिळवण्याची इच्छा आहे.
– आरती राम दसगुडे, महिला क्रिकेटर
Add Comment