Uncategorized

शिरुर- हवेलीचा तिढा कायम, भाजप आणि राष्ट्रवादीत रस्सीखेच. भाजपचं पारडं जड…?

शिरूर : सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सर्वच राजकीय पक्षांतील इच्छुक उमेदवारी मिळावी यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न करत आहे. मात्र अद्याप कोणत्याही पक्षांनी उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली असली तरी देखील संभाव्य उमेदवार आणि इच्छुक यांच्यात उमेदवारी मिळवण्यासाठी चांगलीच रस्सीखेच सुरू आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्ह्यातील शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अशोक पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. यामुळे आघाडीत असणाऱ्या शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर ( माऊली ) कटके हे पक्ष सोडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चा आहेत. या चर्चा सुरू असताना माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अजित पवार यांच्याकडे कटके यांना उमेदवारी मिळावी यासाठी आग्रह धरत असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.अजित पवार गटाला पक्षातील प्रबळ उमेदवार नसल्याने त्यांना चर्चेत असलेल्या कटके यांना पक्षात घेऊन उमेदवारी निश्चित करावी लागेल. मात्र कटके यांच्या नावाला राष्ट्रवादी ( अजित पवार ) गटाच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध होताना दिसत आहे. नुकतीच शिरूर हवेलीतील अजित पवार गटाच्या पदाधिकारी यांची बैठक झाली आणि या बैठकीत ‘आयात उमेदवार घेऊ नये’ अशी चर्चा करण्यात आल्याची खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिली आहे. आम्ही एकनिष्ठ कार्यकर्ते असून आमच्यातील कोणालाही उमेदवारी द्यावी अशी एकमुखी मागणी करत थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिले आहे. 

महायुतीत शिरूर हवेलीतील कार्यकर्ते उमेदवारीसाठी राष्ट्रवादी आग्रही आहे. परंतु भारतीय जनता पक्ष ही जागा सोडण्याच्या मनस्थितीत दिसत नाही. भाजपने दौंड आणि शिरूर या दोन ठिकाणी आपली ताकद पणाला लावली आहे. युतीत राष्ट्रवादीचे पुणे जिल्ह्यात वर्चस्व आहे. परंतु जरी दौंड येथे भाजपने झेंडा फडकावला असला तरी शेजारी असणाऱ्या  शिरूरमध्ये भाजपला यश मिळालेले नाही. मात्र यावेळी शिरूरमध्ये भाजप राष्ट्रवादीला शह देण्याच्या तयारीत आहेत.एकेकाळी राष्ट्रवादीत असलेले पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रदिप कंद यांना भाजपने निवडणूक प्रमुख म्हणून त्यांची निवड केली आहे. तसेच भाजपकडून कंद यांना स्थानिक पातळीवर पक्षीय रसद पुरवली जात आहे. त्याचप्रमाणे भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी प्रदिप कंद यांना एकमुखी पाठिंबा दिला आहे. यामुळे भाजपात अंतर्गत कलह जरी असला तरी देखील प्रदिप कंद यांच्या विजयाच्या समिकरणांसाठी खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्यानातून तलावर बाहेर काढून राजकीय युद्धाला सामोरे जातील यात तिळमात्र शंका नाही.

महायुतीतील तीनही पक्ष शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी सामोरे जात असताना अनेक अडचणी येणार आहेत. एकीकडे दोन वेळा विधानसभा सदस्य असलेले पवार विरुद्ध कटके / कंद असा सामना होणार आहे. परंतु पुणे जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असला तरी देखील भाजप किमान दोन जागा या जिल्ह्यात घेतल्याशिवाय राहणार नाही. दौंड विधानसभा भाजप आमदार राहुल कुल यांच्या गळ्यात पुन्हा विधानसभा निवडणुकीची माळ गळ्यात घालतील आणि त्या पाठोपाठ आता शिरूर – हवेली मतदारसंघाची उमेदवारी भाजपला मिळणार अशा चर्चा सुरू असल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष पाहायला मिळत आहे.

Featured

error: Copying content is not allowed!!!