Uncategorized

तुम्ही दहावी कोणाला बसवून पास झालात ? – शेवाळे

रांजणगाव गणपती :  राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचा मंचर येथे युवक मेळावा पार पडला होता. शिरुर-आंबेगावचे तालुकाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांनी दिलीप वळसे पाटील यांच्या सानिध्यात आल्यानंतर मी ‘वाल्या’ चा वाल्मिकी झाल्याचे असे विधान केले होते. मात्र आता हे विधान त्यांच्या चांगलंच अंगलट आल्याची सध्या चर्चा सुरु आहे. यावर रांजणगाव येथे झालेल्या पत्रकार परिषदेत कारेगावचे अ‍ॅड. संग्राम शेवाळे यांनी पाचुंदकर यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.  

महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार देवदत्त निकम यांचा नुकताच दौरा रांजणगाव गणपती येथे येथे पार पडला आहे. यावेळी देवदत्त निकम यांच्यानंतर शेवाळे यांनी पत्रकार परिषदेत पाचुंदकर यांच्या शिक्षणाचा मुद्दा बाहेर काढला आहे. ‘तुम्ही दहावी कसे पास झालात? कोणाला बसवुन पास झालात? हे जर विचारलं आणि तुम्ही अशा पद्धतीने पास होऊन जर एक एक कोटींच्या गाड्यांमध्ये फिरत असाल तर त्या कश्या आल्या? हा माझा तुम्हाला प्रश्न आहे.’ अशी खोचक टीका शेवाळे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. 

‘स्वतःला शेतकरी पुत्र म्हणवून घेता आणि मग रांजणगाव सारख्या ठिकाणी पाच पाच एकर जमिनी कशा काय? ” असा सवाल काही दिवसांपुर्वी उपस्थित करत शिरूर – आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांनी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक देवदत्त निकम यांच्यावर टीका केली होती. यावर शेवाळे यांनी पाचुंदकरांचा खरपूस समाचार घेतला आहे. म्हणाले की, आमची लढाई छोटी नसुन आमची लढाई मोठी आहे. निकम साहेबांचं नावं आता राज्यात घेतलं जातंय. त्यामुळे अशा छोटया लोकांबद्दल चर्चा करण्यात आम्ही वेळ वाया घालवणार नाही.देवदत्त निकम हे शेतकरी असुन आजही त्यांचं एकत्रित कुटुंब आहे. ते स्वतः शेती करतात. असं असताना जर निकम साहेबांनी रांजणगाव सारख्या ठिकाणी शेती घेतली तर तुमच्या कशाला पोटात दुखायला पाहिजे? तुमचं असं मत आहे कां की जमिनी फक्त तुम्हीच घेतल्या पाहिजे. जर एखाद्या आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्याने रांजणगाव सारख्या ठिकाणी जमीन घेतली तर बिघडल कुठं? हा तुम्हाला माझा प्रश्न आहे.ज्यावेळी रांजणगाव मध्ये सभा होईल. त्यावेळी असे साठवून ठेवलेले अनेक बॉम्ब आम्ही त्यावेळेस फोडू’ असा देखील इशारा यावेळी शेवाळे यांनी दिला आहे.

रांजणगाव गणपती येथे पत्रकार परिषदेत यावेळी संग्राम शेवाळे, राष्ट्रवादी ( शरदचंद्र पवार ) काँग्रस पक्षाचे शिरूर आंबेगाव उपाध्यक्ष विकास फंड, कुमार नानेकर, उत्तम कुटे, पांडुरंग खेडकर, निलेश लांडे तसेच रांजणगाव गणपती येथील ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. 

Featured

error: Copying content is not allowed!!!