शिरूर : विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून सर्वांचे लक्ष आता जागा वाटपाकडे लागले आहे. पक्षाकडून तिकीट मिळवण्यासाठी इच्छुकांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. अशातच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांनी आज (दि.२१ ऑक्टो.) रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. यामुळे शिरूर हवेलीत शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात महायुती कुणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनेक दिवसांपासून ही जागा भाजपमध्ये असलेले जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद यांच्या ओंजळीत जाणार अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू होती. मात्र अचानक कटके यांच्या प्रवेशामुळे शिरूर-हवेलीची जागा राष्ट्रवादीला सुटणार हे आता नक्की झाले आहे. महायुतीकडून कटके हेच उमेदवार असणार आहेत, हे जवळपास स्पष्ट झाले आहे.राष्ट्रवादी ( शरद पवार ) काँग्रेस पक्षाचे आमदार अशोक पवार यांना पराभूत करण्यासाठी मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांपैकी ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके, प्रदीप कंद या दोन उमेदवारांमध्ये रस्सीखेच सुरू आहे.सध्या कटके यांनी नागरिकांना उज्जैन तीर्थक्षेत्र दर्शनासाठी योजना केले होते. प्रचाराचा एक भाग लक्षात घेता त्यांनी आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. माजी खासदार व म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांचा आग्रह आणि प्रचारात आघाडी यामुळे अजित पवारांनी कटके यांना पक्षात घेतले आहे. त्यातच माऊली कटके यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने महायुतीकडून तिकीट कोणाला मिळणार? याकडे शिरूर-हवेलीतील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, विद्यमान आमदार अशोक पवार हे सलग चौथी निवडणुक लढवत आहेत. त्यातच ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी पदाधिकाऱ्यांसह प्रवेश केल्याने शिरूर-हवेलीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे शिरूर-हवेली मतदार संघामध्ये सामना रंगणार आहे.
Add Comment