शिरूर/आंबेगाव : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुक जाहीर झाली आहे. पुणे जिल्ह्यात बारामती नंतर जर चर्चेत असलेला मतदारसंघ कोणता असेल तर तो म्हणजे आंबेगाव विधानसभा मतदारसंघ आहे. गेल्या ३५ वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी आपले अधिराज्य गाजवले आहे. राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत पाहायला मिळणार आहे.
२००९ पूर्वी आंबेगाव मतदारसंघ खेड तालुक्यातील काही गाव जोडून पूर्ण केला होता. त्यावेळी परस्पर विरोधी असणाऱ्या शिवसेना आणि भाजप यांनी वळसे यांना पराभुत करण्यासाठी प्रयत्न केले, मात्र त्यांना अपशयाला सामोरे जावे लागले. २००९ नंतर आंबेगाव मतदारसंघाला शिरूर तालुक्यातील ४२ गावे जोडण्यात आली आहेत, तर आंबेगाव तालुक्यात १०४ गाव आहे. आंबेगाव – शिरूर विधानसभा मतदारसंघात शिरूर तालुक्यातील ४२ गावांमधील कार्यकर्त्यांना सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना भेटण्यासाठी तीन जिल्हा परिषद गटातील नेत्यांना ओव्हरटेक करून जाता येत नाही. वळसे पाटील यांना भेटण्यासाठी जरी कार्यकर्ते गेले तरी देखील पुन्हा तीन जिल्हा परिषद गटातील नेत्यांना याची कल्पना द्यावी लागते. प्रलंबित असणारे अनेक प्रश्न वळसे पाटील यांच्यापर्यंत पोहोचत नसल्याने मतदारसंघातील अनेक प्रश्न आज ‘जैसे थे’ आहे.
राष्ट्रवादी ( अजित पवार ) काँग्रेस पक्षात स्थानिक नेत्यांपैकी प्रमुख तीन असणाऱ्या पाचुंदकर, पवार आणि गावडे यांनी शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांसोबत जाण्याचे ठरवले आहे. मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्था अथवा कोणत्याही निवडणुका असल्यास ४२ गावातून या तीन घरांमधील सदस्यांना प्रामुख्याने विचारात घ्यावे लागते. यामध्ये प्रामुख्याने पवार कुटुंबातील माजी आमदार पोपटराव गावडे, जिल्हा परिषद सदस्या सुनिता गावडे व घोडगंगा साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र गावडे तर पवार कुटुंबातून बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार, जिल्हा विकास मंचचे सदाशिव पवार व पुणे जिल्हा दुध संघाच्या संचालिका केशरताई पवार तसेच पाचुंदकर कुटुंबातून माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर, बाजार समितीचे माजी उपसभापती व राष्ट्रवादी ( अजित पवार ) काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर व जिल्हा परिषदेच्या सदस्या स्वाती पाचुंदकर असे मुख्य राजकारण आता पर्यंत राहिले आहे.
मात्र राष्ट्रवादी फूट पडल्यामुळे माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर आणि जिल्हा परिषद सदस्या स्वाती पाचुंदकरांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे थोडेफार पाचुंदकर जरी कमी झाले तरी देखील वळसे पाटील यांचं पाचुंदकर, पवार आणि गावडे असे राजकारणाच गणित अद्यापही तसेच आहे.या ४२ गावांना शिरुरच्या राजकारणात विशेष महत्व असून या तीन घरांना तसेच या तीन घरातील असलेल्या पुढाऱ्यांना विशेष असे महत्व आहे.
Add Comment