हिवरे,शिरूर : ‘साहेब हे घ्या तुम्हाला पाचशे रुपये आणि गुलाल तुम्ही आताच घ्या…’ असे उदगार कानावर येताच सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला आहे. विधानसभा निवडणुक २०२४ ची रणधुमाळी सुरू आहे. शिरूर आंबेगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी ( शरदचंद्र पवार ) काँग्रेस पक्षाचे उमेदवार देवदत्त निकम यांच्या प्रचार दौऱ्यात ही घटना घडली आहे.
पुणे जिल्ह्याच्या निवडणूक रणधुमाळीत शिरूर आंबेगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी ( अजित पवार) काँग्रेसचे उमेदवार व सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी ( शरद पवार ) काँग्रेस पक्षाचे उमेदवार देवदत्त निकम यांचा प्रचार दौरा सुरू आहे. शिरूर तालुक्यातील हिवरे गावात दौरा सुरू असताना गाव बैठकीत एका वृद्धाचा आवाज कानावर पडला आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला आहे. ‘साहेब गुलाल तुम्ही आताच घ्या आणि हे घ्या तुम्हाला पाचशे रुपये…’ असे म्हणत त्यांनी निकम यांना विजयाचा गुलाल घेण्यासाठी निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याच्या अगोदरच लोकवर्गणी दिली आहे. हिवरे गावातील ग्रामस्थ किसन गणपत तांबे यांनी खिशातील पाचशे रुपयांची नोट लोकवर्गणी म्हणून दिली आहे. यापूर्वी देखील तांबे यांनी लोकसभा निवडणूक वेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना देखील ११०० रुपयांची लोकवर्गणी दिली होती.
निकम यांना संपूर्ण मतदारसंघातून लोकवर्गणी विविध गावांमधून येत असल्याने ही निवडणूक मोठी चुरशीची होणार असे चित्र निर्माण झाले आहे. ३५ वर्षांपासून आमदार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा मोठा जनसंपर्क आणि एकेकाळी त्यांच्यासोबत असलेले देवदत्त निकम यांच्यात आगामी विधानसभा निवडणुकत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Add Comment