शिरूर : विधानसभा मतदारसंघ निवडणूक हा भारतीय जनता पक्षाने लढवावा असा आग्रह पक्षातील अनेक कार्यकर्ते वरिष्ठांना करत होते. मात्र शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघ हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पक्षाला गेला आहे. नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केलेले ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांना पक्षाने उमेदवारी निश्चित केली आहे. आज झालेल्या राष्ट्रवादीच्या दुसऱ्या यादीत कटके यांचे नाव आल्याने लढत रंगतदार होणार आहे.
महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार अशोक पवार यांनी शिरूर हवेली मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. एकीकडे पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, मात्र दुसरीकडे महायुतीचा उमेदवार कोण याची चर्चा सुरू होती. भाजप देखील शिरूरसाठी प्रदीप कंद यांच्यासाठी आग्रही होती. दरम्यान अजित पवारांच्या अस्तित्वाची असलेली ही जागा आज राष्ट्रवादीने जाहीर केल्याने भाजपला या जागेसाठी माघार घ्यावी लागली आहे. राष्ट्रवादीचे पवार विरुद्ध राष्ट्रवादीचे कटके अशी लढत शिरूर हवेलीत रंगणार आहे.
कटके यांना उमेदवारी मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली आहे. काही महिन्यांपूर्वी कटके यांनी नागरिकांना तीर्थक्षेत्र दर्शनासाठी योजना सुरू केले होती. तसेच मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पुणे जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद आणि ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या झालेल्या खाजगी बैठकीत फॉर्म्युला ठरला असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे. कंद यांना बँकेचे चेअरमन आणि कटके यांना विधानसभेची उमेदवारी असा हा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या फॉर्मुलामुळे कंद यांनी शेवटच्या क्षणी माघार घेतली आणि कटके यांना ही उमेदवारी मिळाली आहे. दोन वेळी आमदार असलेले पवार यांचा मतदारसंघात असलेला दांडगा जनसंपर्क आणि विविध निधीतून केलेला विकास यामुळे कटके यांना ही निवडणूक सोपी असणार नाही.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात शिरूर येथे भर सभेत शरद पवारांनी अशोक पवारांना मंत्री पदाचा शब्द दिला आहे. मात्र त्याच दरम्यान, शिरूर येथे महायुतीच्या सभेत अजित पवार यांनी ‘मंत्री व्हायला निघाला, तू आमदार कसा होतो ‘ असा थेट दम दिला आहे. त्यामुळे शिरूर येथील जनतेतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. मात्र आता याचा फटका कटके यांना बसणार की, आमदार अशोक पवार तिसऱ्यांदा आमदार होणार यासाठी येणाऱ्या २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे.
Add Comment