तात्काळ उपाययोजना करा, डॉ. कोल्हेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र.
शिक्रापूर | चाकण – शिक्रापूर रस्ता हा राज्यातील सर्वाधिक वाहनांची वर्दळ असलेल्या रस्त्यांपैकी एक रस्ता ओळखला जातो. या रस्त्यावर होणाऱ्या अपघातांची मालिका थांबता थांबत नाही. सातत्याने गंभीर स्वरूपाचे अपघात या रस्त्यावर घडत आहेत. रस्त्याच्या दुरुस्तीकडे नेहमीच दुर्लक्ष झालेले आहे. निष्पाप जीवांचा बळी घेणारा हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. रस्त्याच्या दुतर्फा वास्तव्यास असलेल्या नागरिकांना रुग्णवाहिकेचा कर्कश आवाज नित्याचा झाला आहे. वाहतूक कोंडी तर या रस्त्याच्या पाचवीलाच पुंजली आहे की काय असे मत अनेक प्रवाशी व्यक्त करत आहेत.
चाकण – शिक्रापूर रस्त्यावर झालेल्या या अपघातानंतर खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी तात्काळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्र लिहून कळविले आहे की, तळेगाव चाकण शिक्रापूर राष्ट्रीय महामार्गावर सातत्याने अपघात होत असून आजवर अनेकांना अपघातात जीव गमवावा लागला आहे. दि. ६ जानेवारी २०२५ रोजी या रस्त्यावरील पिंपळे जगताप गावानजिक झालेल्या अपघातात २ चिमुकल्यांसह तिघांचा मृत्यू झाला. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम या अपघाताना कारणीभूत आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोन्हीकडून सातत्याने रस्त्याच्या विकसनाबाबत होणारी टोलवाटोलवी यामुळे हा रस्ता अपघाताचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. डिसेंबर २०२३ मध्ये तळेगाव चाकण शिक्रापूर एलिव्हेटेड रस्त्याच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू झाली. दुर्दैवाने निवडणुका संपल्यानंतर राज्य सरकारच्या मागणीनुसार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने विकसनासाठी MSIDC कडे हस्तांतरीत केला आणि पुन्हा पाढे पंचावन्न अशी स्थिती निर्माण झाली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या खेळात नागरिकांचा बळी जातो असून दोन्ही सरकारे याबाबत गांभीयनि निर्णय घेत नाहीत, हे नागरिकांचे दुर्दैव म्हणावे लागेल.
या संदर्भात मी दि. २८ डिसेंबर २०२४ रोजी पत्र पाठवले होते. या सर्व महामार्गांच्या एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या कामांचा मी सातत्याने पाठपुरावा करीत आहे. आज झालेल्या अपघातामुळे पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो की, तळेगाव चाकण शिक्रापूर, नाशिक फाटा ते चांडोली आणि पुणे शिरूर या तीनही एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या कामांबाबत तातडीने लक्ष घालून ही कामे लवकर सुरू करण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा. तसेच दरम्यानच्या काळात अपघात रोखण्यासाठी गतिरोधक बसविणे, रस्ता दुरुस्तीसह विविध सुरक्षाविषयक उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला द्यावेत, अशी विनंती खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली आहे.
चाकण-शिक्रापूर रस्त्यावर अपघातांची संख्या वाढत आहे, ज्यामुळे हा मार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. चाकण परिसरातील विविध रस्त्यांवर दर महिन्याला सुमारे ३० अपघात होतात, ज्यात सरासरी ५ ते ६ जणांचा मृत्यू होतो, आणि २० ते २५ पादचारी जखमी होतात. शिक्रापूर ते साबळेवाडी या भागात होणाऱ्या अपघातामध्ये मृत्य नेहमीचा ठरलेला आहे. चाकण – शिक्रापूर रस्त्यावर भीषण अपघातात मृत्यू ही हेडलाईन आता सर्वांच्या वाचनातील कायमची झाली आहे. कोणतीही चूक नसताना दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या अनेकांना आपला जीव या रस्त्यावर गमवावा लागला आहे. एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांवर याच रस्त्यावर काळाने घाला घातला आहे.
पिंपळे जगतापच्या आदित्य आणि शिवमची काय चूक होती ? आपल्या वडिलांसोबत शाळेला निघालेल्या या दोन चिमुकल्यांवर नियतीने वक्र दृष्टी फिरवली. गणेशच्या पत्नीची काय चूक होती एका बाजूला लेकरांचे मृतदेह तर दुसऱ्या बाजूला पतीच्या मृतदेहाला अग्नी दिला गेला. दुःख पचवायचं कसं ? होतं नव्हतं ते सगळं काळाने हिरावून घेतलं. सोमवारचा दिवस लगबगीने आवरून शाळेत जाण्यासाठी दोन्ही लेकरं आपल्या बापासोबत शाळेत निघाली होती. केवळ अर्धा किलोमीटरचा प्रवास आणि अवघ्या ५० मीटर अंतरावरून वळण घेऊन शाळेत जाऊन धडे गिरवणार होते. परंतु मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणाऱ्या ट्रक चालकाचा ताबा सुटला आणि बापासह लेकरांच्या आयुष्यातील धडेच संपले.
अशीच मांजरेवाडीची युवती विध्यालायातून घराकडे निघाली होती अवघ्या ५० फुटांनंतर हायवे सोडून वळण घेऊन घरी पोहचणार होती. काळाने घाला घातला आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. करंदीचे आजोबा नातवाच्या नवीन हॉटेल मधून बाहेर पडले आणि भरधाव वेगाने येणाऱ्या गाडीने त्यांचा प्राण घेतला. पिंपळे जगतापच्या एका महिलेलाही दुचाकीवरून रस्ता ओलांडताना याच रस्त्यावर आपला जीव गमवावा लागला नशीब बलवत्तर म्हणून पाठीमागे बसलेल्या तिच्या लहान मुलाचा जीव वाचला.
दोन वाहनांच्या सोमोरसमोर झालेल्या धडकेत एका युवकाने जातेगाव परिसरात आपला जीव गमावला. डांबरी रस्ता असला तरी जातेगाव फाटा परिसरात वाहनतळामुळे पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य असते याच चिखलात करंदीच्या युवकाची रात्री घराकडे येताना दुचाकी घसरली आणि अंगावरून ट्रक गेला. अशा अनेक घटना सांगता येतील ज्या घटनांमध्ये सातत्याने बळी गेले आहेत. प्रशासनाने तात्काळ यावर उपाययोजना कराव्यात अन्यथा स्थानिक ग्रामस्थ आक्रमक होतील आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल.
Add Comment