Uncategorized

मागेल त्या ग्रामपंचायत सदस्याच्या वार्डमध्ये टँकर..!

विकास गायकवाड यांच्याकडून मोफत पाणी वाटप.

पाबळ | केंदूर – पाबळ जिल्हा परिषद गटातील पाण्याची टंचाई ओळखून सामाजिक कार्यकर्ते विकास गायकवाड यांनी स्वखर्चातून दुष्काळग्रस्त गावांना पिण्याच्या पाण्यासाठी मोफत पाण्याच्या टँकरची व्यवस्था सुरू केली आहे. निवडणुका लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या आणि या संकटात हातावर हात ठेवून बसलेल्या राजकीय पुढाऱ्यांना विकास गायकवाड यांच्या या उपक्रमामुळे जबरी चपराक लगावली आहे.


पाबळ (ता. शिरुर) येथे बारा हजार लिटर पाण्याची क्षमता असलेले दोन टँकर जोपर्यंत पाण्याचा तुटवडा आहे तोपर्यंत केंदूर – पाबळ जिल्हा परिषद गटात रोज सहा फेऱ्या मारणार आहेत. याशिवाय कान्हूर मेसाई आणि धामारी या दोन गावांसाठी देखील येत्या दोन दिवसांत आणखी टँकरची व्यवस्था करून पाण्याची टंचाई भासणाऱ्या गावांत मागेल त्या ग्रामपंचायत सदस्याच्या वार्डमध्ये मोफत पाणी दिले जाणार आहे. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते विकास गायकवाड यांनी ‘The बातमीशी’ बोलताना दिली. केंदूर – पाबळ जिल्हा परिषद गटातील ज्या ज्या गावांना पाण्याचा तुटवडा आहे त्या त्या गावात वाडीवस्तीवर सरकारच्या यंत्रणेची वाट न पाहता पाणी पोहचवण्यासाठी विकास गायकवाड यांनी स्वतःचा खिसा रिकामा करण्याचा संकल्प केला आहे.


दरम्यान सरकार मध्ये सामील असलेल्या पक्षाचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी पाणी टंचाईकडे सपशेल दुर्लक्ष करताना दिसत आहे, त्याहून उलट विरोधी पक्षातील पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी या संकटात हातावर हात ठेवून बसले आहेत. केवळ लग्न, दशक्रिया विधी, सत्यनारायण पूजा, वाढदिवसाला उपस्थित राहणाऱ्या पुढाऱ्यांनी किमान सरकारकडून दुष्काळग्रस्त गावांना पाण्याच्या टँकरची मागणी करावी अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.


विकास गायकवाड यांनी गेल्या अनेक वर्षांपासून मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याची परंपरा चालू ठेवली आहे, दरम्यान या वर्षी सामुदायिक विवाह सोहळ्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद न मिळाल्याने गायकवाड यांनी महिलांच्या मनोरंजन आणि कलागुणांना वाव देण्यासाठी ‘पैठणीचा खेळ’ आयोजित केला होता. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले विकास गायकवाड यांनी सातत्याने केंदूर – पाबळ जिल्हा परिषद गटात मदतीचा हात कायम ठेवला आहे. हिवरे गावच्या माजी सरपंच पत्नी शारदा गायकवाड यांच्या सरपंच पदाच्या कार्यकाळात गावात अनेक विकासकामे करण्यात मोठा वाटा गायकवाड यांनी उचलला आहे. पक्ष विरहित समाजसेवा करणाऱ्या विकास गायकवाड यांचे या उपक्रमामुळे कौतुक केले जात आहे.

जनावरांची तहान भागवण्यासाठी सर्वसामान्य शेतकऱ्यांची पाण्यासाठी वणवण सुरू होती यंत्रणा मिळेल की, नाही याची वाट न बघता विकास गायकवाड यांनी जो मदतीचा हात दिला आहे तो अत्यंत कौतुकास्पद आहे, खऱ्या अर्थाने जलदुत म्हणून विकासनाना यांची प्रतिमा निर्माण झाली आहे. – सचिन वाबळे ( मा. सरपंच, पाबळ ग्रामपंचायत)

error: Copying content is not allowed!!!