Uncategorized

शिरूर तालुक्यात प्रारूप यादी जाहीर होताच ‘भावी सदस्यांचे’ फ्लेक्स सोशल मीडियावर कहर !

शिरूर : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात महत्त्वाची हालचाल घडली असून, नुकतीच जिल्हा परिषद गटांची प्रारूप यादी जाहीर झाली आहे. यानंतर सोशल मीडियावर ‘भावी जिल्हा परिषद सदस्य’ या टॅगलाइनसह अनेक इच्छुक उमेदवारांचे फ्लेक्स, डिजीटल बॅनर आणि शुभेच्छा संदेश झळकू लागले आहेत.

प्रारूप यादीमुळे काही जुन्या गटांच्या सीमारेषांमध्ये बदल झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार, पक्षीय कार्यकर्ते आणि समर्थकांनी लगेचच प्रचाराची आघाडी घेत सोशल मीडियावर आपली उपस्थिती दाखवायला सुरुवात केली आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, WhatsApp अशा विविध प्लॅटफॉर्मवर “शिरूर तालुक्याचे भावी प्रतिनिधी” असे लिहिलेल्या पोस्टरनी अक्षरशः सोशल मीडियावर ‘फ्लेक्स वॉर’ सुरू केला आहे.

फेसबुक, इंस्टाग्रामवर ‘भावी सदस्यांचा कहर

“जनतेचा आवाज”, “शिरूरच्या विकासासाठी कटिबद्ध”, “आपल्या सेवेसाठी सज्ज” अशा घोषणा झळकवणारे बॅनर आणि फोटो मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहेत. विशेषतः रांजणगाव गणपती, केंदुर, तळेगांव , शिक्रापूर, कोरेगाव भीमा गटांमध्ये मोठ्या प्रमाणावर सोशल मीडिया प्रचार सुरू झाला आहे. काही ठिकाणी एकाच गटासाठी दोन-तीन उमेदवार आपआपल्या समर्थकांच्या माध्यमातून फ्लेक्स प्रसिद्ध करताना दिसत आहेत.

स्थानिकांमध्ये उलटसुलट प्रतिक्रिया

ही सगळी स्थिती पाहता शिरूर तालुक्यातील ग्रामस्थांमध्ये उत्सुकता आणि चर्चांना उधाण आले आहे. निवडणुकीची अधिकृत घोषणा अद्याप झाली नसतानाही सुरू झालेला हा ‘डिजीटल प्रचार’ काहींना योग्य वाटतोय, तर काहीजण याला “आगाऊ राजकारण” म्हणत आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर “हे काम करण्याआधी काम बोललं पाहिजे!” अशा प्रतिक्रिया देत हे फ्लेक्स ट्रेंडवर टीकाही केली आहे.

error: Copying content is not allowed!!!