शिरूर : रांजणगाव गणपती विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन पदावर गोरक्ष गदादे आणि कैलास लांडे यांची व्हॉईस चेअरमन पदावर बिनविरोध निवड झाली आहे. शांत आणि सलोख्याच्या वातावरणात झालेल्या या निवडणुकीत सर्व संचालकांनी एकमताने निर्णय घेत, नवे नेतृत्व निवडून दिले आहे.
सोसायटीच्या सभागृहात नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत चेअरमन व व्हॉईस चेअरमन पदांची निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कामकाज पाहिले. यावेळी संचालक मंडळातील सर्व सदस्य उपस्थित होते. दोनही पदाच्या निवडीनंतर नवनियुक्त व्हाइस चेअरमन कैलास लांडे यांनी विश्वास व्यक्त केला की, “सदस्यांचा विश्वास जपण्यासाठी आणि सोसायटीची आर्थिक स्थिती अधिक सक्षम करण्यासाठी पारदर्शक व विकासाभिमुख कारभार केला जाईल, तसेच शेतकरी व सदस्यांच्या गरजांना प्राधान्य देत, सर्वांसाठी सोयी-सुविधा वाढविण्याचा प्रयत्न करू.”
सोसायटी ही रांजणगाव गणपती परिसरातील महत्त्वाची सहकारी संस्था असून, शेतीविषयक कर्जपुरवठा, खत-बी-बियाणे पुरवठा, तसेच अन्य कृषी सुविधा उपलब्ध करून देण्यात ती अग्रणी आहे. नव्या नेतृत्वाच्या निवडीमुळे सदस्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.या निवडीनंतर उपस्थित सदस्य व ग्रामस्थांकडून नव्या पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
Add Comment