शेलपिंपळगाव – खेड तालुक्यातील राजकारणाची दखल वरिष्ठ नेत्यांना घ्यावी लागली, शिवसेना – राष्ट्रवादी खेड तालुक्यात अजिबात जुळवून घ्यायला तयार नाही. त्यातच आता जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूका येत्या काही महिन्यांवर आलेल्या आहेत. त्याअगोदरच इच्छुक उमेदवार मीच पक्षाचा उमेदवार असल्याचे भासवत आहेत.
याच गटात २०१७ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्मला पानसरे यांनी राजू जवळेकर यांच्या भगिनी शिवसेनेच्या उमेदवार सुवर्णा मिसाळ यांचा पराभव केला. पुढे निर्मला पानसरे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा देखील झाल्या आहेत.
अद्याप आरक्षण जाहीर नाही, निवडणूक कार्यक्रम जाहीर नाही तोच आमदार दिलीप मोहिते यांच्या कुटुंबातील आता नवखे चेहरे समोर यायला लागले आहेत. कार्यकर्त्यांनी त्यांच्या नावापुढे आत्ताच भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल केले आहेत. आमदार दिलीप मोहितेंचे पुतणे मयूर आणि रोहन यांच्या नावाची त्यामुळे चर्चा सुरू झाली आहे.
इकडे बाजार समितीचे संचालक सयाजी मोहिते देखील इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर आमदार मोहिते यांचे निकटवर्तीय आणि माजी सरपंच शशिकांत मोरे हे देखील जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. निर्मला पानसरे यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या विकासकामांचा आलेख पाहता पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विध्यमान जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांना संधी देणार का.? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवसेनेच्या देखील इच्छुकांची यादी मोठीच आहे यामध्ये राजू जवळेकर, माजी तालुका प्रमुख प्रकाश वाडेकर, विष्णूदास उर्फ बाप्पु थिटे, विजयसिंह शिंदे यांच्या नावाची देखील चर्चा सुरू आहे. तर काँग्रेसचे माजी पंचायत समिती सदस्य सोमनाथ दौंडकर आणि माजी जिल्हा परिषदेच्या सदस्या वंदना सातपुते यांनी देखील मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. तर भारतीय जनता पार्टी ची ताकत या भागात कमजोर असल्याने अजून कोणीही इच्छुक नसल्याचे दिसून येत आहे…
गेल्या विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराच्या दरम्यान आमदार मोहिते यांनी “माझी ही शेवटची निवडणूक आहे, शेवट गोड करा” अशी भावनिक साद खेड – आळंदी मतदार संघातील जनतेला घालून विजय मिळवला होता त्यानंतर निवडून आल्यावरही “पुढील विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या कार्यकर्त्याला पुढे आणून त्याच्या पाठीशी उभा राहील” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती त्यामुळे आता मोहिते पाटील यांचा राजकीय वारसदार कोण होणार आमदार मोहिते कोणाच्या गळ्यात जिल्हा परिषदेच्या उमेदवारीची माळ टाकणार त्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
Add Comment