आंबेगाव

देवदत्त निकमांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक. डॉ. कोल्हेंना शिवसैनिकांनी घेरलं, भावी आमदार उल्लेख अंगलट.

मंचर | येथे महाविकास आघाडीच्या वतीने नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम यांचा उल्लेख खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी भावी आमदार म्हणून ककरताच शिवसैनिक आक्रमक झाले. देवदत्त निकम यांच्या कथित उमेदवारीबाबत आक्षेप घेत शिवसैनिकांनी डॉ. कोल्हे यांना घेरलं.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान देवदत्त निकम यांनी शिवसैनिकांना दुय्यम वागणूक दिली, शिवसेना (उबाठा) पदाधिकाऱ्यांना अपमानित करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अशा व्यक्तीला भावी आमदार म्हणून आम्ही स्वीकारू शकत नाही अशा भावना व्यक्त करत संतापलेल्या शिवसैनिकांनी भर कार्यक्रमात राडा घातला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुरेश भोर यांच्या उमेदवारीबाबत आम्ही शिवसैनिक ठाम आहोत, आम्ही पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना तशी मागणी करणार असल्याचे यावेळी शिवसैनिकांनी सांगितले.

शिरुर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा मोठा मतदार आहे. आंबेगाव – शिरुर विधानसभा, खेड – आळंदी विधानसभा त्याचबरोबर जुन्नर विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात शिवसेनेची ताकद आहे. या लोकसभेच्या निवडणुकीत शिवसैनिकांनी हिरहिरीने सहभाग घेतलेला पाहायला मिळाला, आणि याच शिवसैनिकांना निवडणूक काळात देवदत्त निकम यांनी अपमानास्पद वागणूक दिल्यामुळे संतापलेल्या शिवसैनिकांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना जाब विचारला. उपस्थित नेत्यांची नावं घेताना देवदत्त निकमांचा भावी आमदार उल्लेख केला आणि काही वेळात अजाण सुरू झाल्याने पुढे काही बोलण्याच्या अगोदर भाषण थांबवावं लागले असल्याचे सांगत डॉ. कोल्हे यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला असला तरी तो शिवसैनिकांनी मान्य न करता नाराजी व्यक्त केली.

आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी आंबेगाव – शिरुर विधानसभा मतदार संघावर आता आपला दावा ठोकला आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार राजाराम बाणखिले यांना ६० हजार मते मिळाली आहेत आणि ते शिवसेनेचे हक्काचे मतदान आहे तर, या लोकसभेला डॉ. कोल्हे यांना ९३ हजार मतदान मिळाले. अर्थात शिवसेनेच्या मतदानाचा आकडा अधिक आहे त्यामुळे या विधानसभा मतदार संघावर शिवसेनेचा हक्क असल्याचे जिल्हा प्रमुख सुरेश भोर यांनी सांगितले.

दरम्यान शिवसैनिकांनी देखील शिवसेनेच्या वतीने विधानसभेचे उमेदवार म्हणून सुरेश भोर यांना संधी मिळावी म्हणून सर्व शिवसैनिक प्रयत्न करणार असल्याचे यावेळी शिवसैनिकांनी सांगितले. त्यामुळे विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी तीव्र इच्छुक असलेले देवदत्त निकम यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. देवदत्त निकम कार्यकर्त्यांना दुय्यम वागणूक देतात यामुळे शिवसैनिकांची नाराजी अधिक वाढत असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत आंबेगाव -शिरुर विधानसभा मतदारसंघात हा वाद मिटतो की अधिक होतो यावर पुढील निवडणुकीची गणितं ठरणार आहेत.

Add Comment

Click here to post a comment

error: Copying content is not allowed!!!