क्राईम

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांची मोठी कामगिरी

शिरूर : पुणे जिल्ह्यातील रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी चेन स्नॅचिंगप्रकरणातील फरार आरोपीस नाशिक येथून अटक करून मोठा गुन्हेगारी तपास यशस्वीपणे उकलला आहे. या प्रकरणात आरोपीकडून सोन्याचे दागिने व इतर मुद्देमाल असा एकूण १० लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २५ मार्च २०२५ रोजी सकाळी सुमारे ८.३० वाजता सौ. वंदना रोहीदास शेटे (वय ३३, रा. पिंपरी दुमाला, ता. शिरूर) या त्यांच्या दुकानासमोर उभ्या असताना, दोन अनोळखी इसमांनी मोटारसायकलवरून येत खरेदीच्या बहाण्याने त्यांच्या गळ्यातील अंदाजे ६०,००० रुपये किमतीचे ११ ग्रॅम वजनाचे मिनी गंठण जबरदस्तीने हिसकावून नेले होते. या प्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासदरम्यान या गुन्ह्यातील मुख्य आरोपी मारुती उर्फ गोविंद रामनाथ आंधळे (वय ३८, रा. लिंबोडी, ता. आष्टी, जि. बीड) यास दिनांक ४ जून २०२५ रोजी अटक करण्यात आली. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली १ लाख रुपये किमतीची मोटारसायकल जप्त करण्यात आली.

दरम्यान, याच गुन्ह्यातील फरार आरोपी शरद बापू पवार (वय २७, रा. लोणी सय्यद मिर, ता. आष्टी, जि. बीड) याचा शोध सुरू होता. पो.कॉ. योगेश गुंड यांना बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे, तो नाशिक येथे नातेवाईकांकडे येणार असल्याचे समजल्यावर तपास पथकाने दि. ९ जुलै २०२५ रोजी नाशिक येथे सापळा रचून आरोपीस अटक केली.

तपासात सदर अटक आरोपीने पुणे जिल्ह्यातील एकूण ८ ठिकाणी चेन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. तसेच आरोपीने दागिने एका सोनारास विकल्याची कबुली दिली. त्या आधारावर पोलिसांनी मुद्देमाल हस्तगत केला आहे.

ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पो.कॉ. योगेश गुंड, पो.कॉ. उमेश कुतवळ, पो.हवा. विलास आंबेकर, पो.कॉ. किशोर शिवणकर यांनी केली.

error: Copying content is not allowed!!!